सिडनी : क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणजेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने मंगळवारी २०२४ या वर्षातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात भारताच्या दोन खेळाडूंना स्थान लाभले असून सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याशिवाय यशस्वी जैस्वालचा या संघात समावेश आहे.
३१ वर्षीय बुमराला सोमवारीच आयसीसीच्या दोन पुरस्कारांसाठीही नामांकन लाभले. बुमराने वर्षभरात १३ कसोटींमध्ये सर्वाधिक ७१ बळी पटकावले. त्याची सरासरी अवघी १४.९२ इतकी आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही बुमरानेच सर्वाधिक ४ लढतींमध्ये ३० बळी घेतले आहेत. त्याशिवाय यशस्वीने १५ कसोटींमध्ये १,४७८ धावा केल्या. यामध्ये दोन द्विशतकांचाही समावेश होता. इंग्लंडच्या जो रूटने वर्षभरात सर्वाधिक १,५५६ धावा केल्या.
२०२४ वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ
जसप्रीत बुमरा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, बेन डकेट, जो रूट, रचिन रवींद्र, हॅरी ब्रूक, कामिंदू मेंडिस, ॲलेक्स कॅरी, मॅट हेन्री, जोश हेझलवूड, केशव महाराज.