मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा अद्याप मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात दाखल झालेला नसल्याने अनेक चाहत्यांची चिंता बळावली आहे.
बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय बुमरा सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्कलोड मॅनेजमेंटच्या अंतर्गत (खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन) तंदुरुस्तीवर भर देत असल्याचे समजते. बीसीसीआयनेच त्याला तसे आदेश दिले होते. एका लोकप्रिय इंग्रजी संकेतस्थळाने याविषयी वृत्त दिले आहे. मात्र बुमरा २९ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वानखेडेवर सलामीचा सामना खेळण्यासाठी मुंबईच्या संघात दाखल होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. तूर्तास मात्र तमाम मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना बुमरा कधी मुंबईत परतणार, याचीच उत्सुकता लागून आहे.
काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
आता आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध सर्वांना लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियमवर सराव करत आहे. भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा बुमरा मात्र सध्या बंगळुरूमध्येच आहे. बुमराला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने दिलेल्या सल्ल्यानुसार तो तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने तेथे दाखल झाला आहे. किमान २७ किंवा २८ मार्चपर्यंत बुमरा मुंबईत परतेल, असे अपेक्षित आहे. अन्यथा मुंबई संघाला पहिल्या लढतीत बुमराविनाच मैदानात उतरावे लागेल.
आयपीएलनंतर भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तसेच पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक असल्याने बुमरावरील भार कमी करणे व त्याला तंदुरुस्त ठेवण्याकडे बीसीसीआयचा कल असेल. बुमराने आयपीएलमध्ये मुंबईसाठी १४८ सामन्यांत १८६ बळी मिळवले असून मुंबईसाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तो आता लसिथ मलिंगापासून (१९५) फक्त ९ बळी दूर आहे. तसेच बुमराने आजवर एकदाही पर्पल कॅप जिंकलेली नाही. त्यामुळेच यंदाच्या हंगामात बुमरा सर्व विक्रम तोडण्यास आतुर असेल.
पाच वेळचा विजेता मुंबईचा संघ यंदा सहाव्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. २०२०मध्ये मुंबईने अखेरची आयपीएल जिंकली होती. पाच वर्षांपासून मुंबईचा संघर्ष सुरू आहे. आता त्यांना जेतेपद मिळवायचे असल्यास बुमराची कामगिरी निर्णायक ठरेल. गतवर्षी मुंबईला क्वालिफायर-२मध्ये पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. २९ मार्च रोजी कोलकाताविरुद्ध मुंबईचा पहिला सामना वानखेडेवर होईल.