नवी दिल्ली : दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी विदर्भाच्या २७ वर्षीय यश ठाकूरची अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तसेच तारांकित जसप्रीत बुमरा, अष्टपैलू नितीश रेड्डी व फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अनुक्रमे १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका होईल. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ या मालिकेचे यजमानपद भूषवत असून बीसीसीआयशी केलेल्या करारानुसार या लढती भारतातच खेळवण्यात येत आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, त्यांनाच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेटचे सामने २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत टी-२० प्रकारांत होतील.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यात शेवटचा सामना खेळलेला राणा बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये स्नायूंच्या दुखापतीतून सावरत होता. मात्र, सोमवारी सरावादरम्यान गोलंदाजी करताना त्याला मांडीच्या स्नायूंची नवी दुखापत झाली. पुनर्वसनादरम्यान त्याने चांगली प्रगती केली होती, परंतु ७ सप्टेंबर रोजी झालेल्या या नव्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळावे लागले, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
दुसरीकडे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेपासून बाहेर असलेल्या बुमराला वैद्यकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच यश ठाकूरने जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण केले होते. त्याने दोन सामन्यांत ४ बळी घेतले आहेत. आता त्याच्याकडे लक्ष असेल.
भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, यश ठाकूर.
पहिली लढत ठरल्याप्रमाणेच
ब्रिक्स शिखर परिषदेच्या सुरक्षेचे आणि वाहतुकीचे कारण देत पहिला टी-२० सामना पुढे ढकलण्याची दिल्ली वाहतूक पोलिसांची विनंती दिल्ली क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) फेटाळून लावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी नियोजित वेळेनुसारच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल, असे डीडीसीएने गुरुवारी स्पष्ट केले.