India vs England 5th Test 
क्रीडा

बुमराचे पुनरागमन! राहुल जायबंदीच; पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर

आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र..

Swapnil S

नवी दिल्ली : आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अनुभवी फलंदाज के. एल. राहुल मांडीच्या दुखापतीमुळे या लढतीलासुद्धा मुकणार आहे. निवड समितीने गुरुवारी अखरेच्या कसोटीसाठी भारताचा चमू जाहीर केला.

३० वर्षीय बुमरा मालिकेतील सुरुवातीचे तिन्ही सामने खेळला. त्यामध्ये त्याने ८१ षटके गोलंदाजी करताना १७ बळी मिळवले. त्यामुळे कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) अंतर्गत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आता ७ मार्चपासून धरमशाला येथे भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी सुरू होईल. भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, ३१ वर्षीय राहुल अद्याप दुखापतीतून सावरला नसून तो आता लंडन येथे उपचारासाठी जाणार असल्याचे समजते. राहुलने सरावाला प्रारंभ केला नसून त्याच्या उजव्या माडींची सूज अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे तो ८५ ते ९० टक्के तंदुरुस्त असला, तरी पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ लागेल. त्यामुळे बुमराच्या रूपात एकमेव बदल संघात करण्यात आला असून ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला रणजी स्पर्धेत खेळण्याची मुभा देण्यात आली आहे.

धरमशाला येथे बर्फवृष्टी

भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. येथे सध्या तापमान १० डिग्रीपर्यंत घसरले असून पुढील काही दिवसांत यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत स्टेडियममध्ये पूर्णपणे बर्फाचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. गुरुवारी मात्र यामध्ये सुधारणा झाली. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी येथे अधिक थंड वातावरण असेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रजत पाटिदार, मुकेश कुमार, आकाश दीप, के. एस. भरत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल