नवी दिल्ली: भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राचे प्रशिक्षक म्हणून जेन झेलेझ्नी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता झेलेझ्नी हे नीरजला भालाफेकीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच नीरज चोप्राचे जर्मन प्रशिक्षक क्लॉस बारटोनेत्झ यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे नीरजला त्यांच्यासोबतचा प्रवास थांबवावा लागला. क्लॉस हे बऱ्याच वर्षांपासून नीरजला मार्गदर्शन करत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही पदके जिंकली. मात्र त्यांनी आता आपला नीरज सोबतचा प्रवास थांबवला आहे. त्यामुळे नीरजने आपल्या नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
नीरजला प्रशिक्षण देण्यासाठी मी उत्सुक
या नियुक्तीनंतर झेलेझ्नी म्हणाले की, नीरज चोप्राला प्रशिक्षण देण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. कारण त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. मी खूप वर्षांपूर्वी नीरजबद्दल एक उत्तम प्रतिभा म्हणून बोललो होतो. जेव्हा मी त्याला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला पाहिले, तेव्हा मला त्याच्याकडून मोठ्या यशाची जाणीव झाली होती. मी असेही म्हणालो होतो की जर मला प्रजासत्ताक बाहेरून कोणाला प्रशिक्षक करायला सुरुवात करावी लागली तर माझी पहिली पसंती नीरज असेल, असे झेलेझ्नी म्हणाले.