PTI
क्रीडा

वाटचाल सोनेरी, पदक रुपेरी! भालाफेकपटू नीरजला यंदा रौप्यवर समाधान, पाकिस्तानच्या अर्शदला विक्रमासह सुवर्णपदक

गोल्डन बॉय म्हणून ख्याती असलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकेल, अशी कोट्यवधी चाहत्यांना आशा होती.

Swapnil S

पॅरिस : गोल्डन बॉय म्हणून ख्याती असलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकेल, अशी कोट्यवधी चाहत्यांना आशा होती. मात्र नीरजच्या सोनेरी वाटचालीचा यावेळी रौप्यपदकासह शेवट झाला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने रौप्यपदक काबिज केले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली.

२६ वर्षीय नीरजने चार वर्षांपूर्वी भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णकमाई केली होती. त्यानंतर जागतिक, राष्ट्रकुल, आशियाई यांसारख्या विविध स्पर्धांमध्येही नीरजचा पहिला क्रमांक ठरलेलाच. पात्रता फेरीतही नीरजने एकाच प्रयत्नात अग्रस्थान पटकावले. मात्र अंतिम फेरीत नीरजला घनिष्ठ मित्र असलेल्या अर्शदकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरजने ८९.४५ मीटर अंतरावर सर्वोत्तम भालाफेक केली, तर २७ वर्षीय नदीमने ९२.९७ मीटरची विक्रमी भालाफेक करून पाकिस्तानसाठी ऐतिहासिक सुवर्ण जिंकले. त्यामुळे नीरजने सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले असले, तरी यावेळी पदकाचा रंग सोनेरी नसल्याने अनेकांचा हिरमोडही झाला.

दुखापतीतून सावरणाऱ्या नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटरचे अंतर गाठले. उर्वरित पाच प्रयत्नांत त्याला योग्य भालाफेक करता आली नाही. तसेच एकदा तो पाय घसरून पडलासुद्धा, तर नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर अंतर कापल्यावर सहाव्या प्रयत्नातसुद्धा ९० मीटरच्या पुढे भाला फेकला. मुख्य म्हणजे टोकियोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर अंतरासह सुवर्ण जिंकले होते. मात्र यावेळी ८९.४५ मीटर अंतर सर करूनही त्याला रौप्यपदकच मिळाले. यावरूनच नीरजसाठी वाढलेली ही स्पर्धा अधोरेखित होते.

प्रत्येक वेळी भालाफेक करताना माझ्या मनात दुखापतीसह चाहत्यांचाही विचार येत होता. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये मी सर्वस्व अर्पण करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतरच्या कामगिरीद्वारे मी समाधानी नाही. देशासाठी दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहे, मात्र यावेळी सुवर्ण राखण्यात अपयश आल्याने मी निराशही आहे.
- नीरज चोप्रा

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा