जय शहा  एक्स
क्रीडा

जय शहा आयसीसीचे नवे अध्यक्ष; ३६व्या वर्षी स्वीकारला पदभार

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रविवारी दुबईतील मुख्यालयात आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गेल्या पाच वर्षांपासून बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहणारे पाचवे भारतीय आणि सर्वात तरुण आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे आता जागतिक क्रिकेटमध्ये शहा पर्व सुरू झाले आहे.

Swapnil S

दुबई : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रविवारी दुबईतील मुख्यालयात आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. गेल्या पाच वर्षांपासून बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहणारे पाचवे भारतीय आणि सर्वात तरुण आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे आता जागतिक क्रिकेटमध्ये शहा पर्व सुरू झाले आहे.

आयसीसीच्या संचालक मंडळाने एकमताने जय शहा यांची निवड केली आहे. न्यूझीलंडच्या ग्रेग बारक्ले यांनी तिसऱ्यांदा कार्यकाळ वाढविण्यास नकार दिला. त्यांच्या जागी आता जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

जय शहा यांच्याआधी उद्योगपती दिवंगत जयमोहन दालमिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, विधीज्ञ शशांक मनोहर आणि उद्योगपती एन. श्रीनिवासन या भारतीयांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यानंतर आता जय शहा यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अवघ्या ३६ व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणारे जय शहा हे

जगातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे पाकिस्तानात नियोजित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हायब्रीड मॉडेलबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा सशर्त स्वीकार केला आहे. त्यानुसार स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत होणार आहेत. मात्र २०३१ पर्यंत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्येही पाकिस्तानसाठी समान मॉडेलची व्यवस्था करावी अशी अट पाकिस्तानने घातली आहे. या स्पर्धांमध्ये भारत आयोजक किंवा सह-आयोजक आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १०० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना आयसीसीचे अध्यक्ष म्हणून जय शहा यांच्यापुढे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्याशी समन्वय साधून आयोजनाचा हा तिढा सोडवण्याचे आव्हान आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनाचा तिढा सुटत नसल्याने स्पर्धेचे वेळापत्रकही अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव भारताने आपल्या संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची भारताची मागणी आहे. या हायब्रीड मॉडेलला पाकिस्तानने नकार दिला आहे. मात्र शनिवारी पीसीबीने या मॉडेलला सशर्त मान्यता दिल्याचे समजते.

लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करणे आणि महिला क्रिकेटला गती देणे ही आव्हाने आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शहा यांच्यापुढे आहेत.

वर्ष २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा, तसेच क्रिकेट खेळाचा जगात आणखी विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

क्रिकेटमध्ये प्रचंड क्षमता असून या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी मी आयसीसीचे संघ आणि सदस्य देशांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे शहा म्हणाले. बार्कले यांनी गेल्या चार वर्षांत आयसीसीमध्ये योगदान दिले आहे. त्याकरीता मी त्यांचे आभार मानू इच्छितो, असे शहा म्हणाले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जय शहा यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये जिल्हा स्तरावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर काम केले. आता तर जागतिक स्तरावरील सर्वोच्च पद त्यांनी स्वीकारले आहे.

बीसीसीआयचे सचिव म्हणून काम करताना जय शहा यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. देशांतर्गत सामन्यांतील खेळाडूंच्या मानधनात वाढ हा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला.

गेल्या पाच वर्षांत जय शहा यांनी सचिव म्हणून बीसीसीआयमध्ये काही लक्षवेधी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा जागतिक क्रिकेट व्यवस्थापनामध्येही दबदबा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आयसीसीच्या रिक्त होत असलेल्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये जय शहा यांचे नाव आघाडीवर होते. अखेर रविवारी आयसीसीच्या मुख्यालयात त्यावर शिक्कामोर्तब झाले.

BMC आयुक्त आणि MPCB सचिव 'हाजिर हो'! HC चा आदेश; हवा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत पालिकेला फटकारले

एकनाथ शिंदे मुंबईत १०० जागांवर ठाम; स्वतंत्र लढण्याचीही रणनीती; भाजपच्या ६० जागांच्या प्रस्तावास नकार

मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : 'पॉवर ऑफ ॲटर्नी'वर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया यांनी सादर केले दस्तावेज

पवार कुटुंबाला दिलासा; लवासाप्रकरणी CBI चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली