क्रीडा

एकदिवसीय क्रिकेटविना पर्याय नाही: जाँटी ऱ्होड्स

भविष्यात एकदिवसीय मालिकांची संख्या कमी होऊ शकते, मात्र ५० षटकांच्या प्रारूपाशिवाय क्रिकेटचा विचार करणे कठीण आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी व्यक्त केले.

प्रतिनिधी

मुंबई : भविष्यात एकदिवसीय मालिकांची संख्या कमी होऊ शकते, मात्र ५० षटकांच्या प्रारूपाशिवाय क्रिकेटचा विचार करणे कठीण आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी व्यक्त केले. फ्रँचायझी टी-२० स्पर्धांच्या वाढत्या प्रभावामुळे येणाऱ्या काळात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते, असा इशाराही ऱ्होड्सने दिला.

युरोपियन टी-२० प्रीमियर लीग (ईटीपीएल) मधील रोटरडॅम डॉकर्स या संघाच्या जर्सी अनावरणप्रसंगी ऱ्होड्सने पत्रकारांशी संवाद साधला. रोटरडॅम डॉकर्स संघाचे सहमालक असलेल्या ऱ्होड्सने २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान नेदरलँड्स आणि आयर्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या ईटीपीएल स्पर्धेबाबत उत्साह व्यक्त केला. टी-२० क्रिकेट सुरू झाले तेव्हा कसोटी क्रिकेटवर दडपण येईल असे म्हटले जात होते, पण प्रत्यक्षात तसे झाले नाही, असे ऱ्होड्सने स्पष्ट केले. “५० षटकांचे क्रिकेट हे असे प्रारूप असू शकते जे येत्या वर्षांत अडचणीत सापडेल. जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटशी स्पर्धा करताना तीन वेगवेगळ्या प्रारूपांमध्ये संतुलन राखणे कठीण होत असून खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकर संपवण्याचा पर्याय निवडू शकतात. तरीही एकदिवसीय क्रिकेटला पाठिंबा देणारा मोठा चाहता वर्ग जगभरात आहे,” असेही ऱ्होड्सने नमूद केले.

आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेबाबत बोलताना ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

आधुनिक क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचा दर्जा अत्यंत उंचावला असल्याचे ऱ्होड्सने सांगितले. पूर्वीच्या काळात तीन-चार चांगले क्षेत्ररक्षक असले तरी चालून जायचे, पण आता एकाही खेळाडूला लपवता येत नाही. भारतीय संघात विराट कोहलीने फिटनेस आणि आक्रमक क्षेत्ररक्षणाची संस्कृती आणली, ज्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षणाचा दर्जा पूर्णपणे बदलला, असे कौतुक ऱ्होड्सने केले.

युरोपियन टी-२० लीगची उत्सुकता

युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या (ईटीपीएल) पहिल्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यताप्राप्त फ्रँचायझी रॉटरडॅम डॉकर्सने आपल्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात सह-मालक जॉन्टी ऱ्होड्स, जॉन अब्राहम, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मधुकर श्री आणि फायरफ्लाइज एआयचे सह-संस्थापक व सीईओ क्रिश रामिनेनी यांच्या उपस्थितीत या जर्सीचे अनावरण करण्यात आले. रॉटरडॅम डॉकर्सची पहिली लढत २६ ऑगस्ट रोजी व्हूरबर्ग येथे 'ॲमस्टरडॅम फ्लेम्स'विरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डूप्लेसिस या संघाचे नेतृत्व करणार असून, त्याच्यासोबत जॉन्टी ऱ्होड्स आणि जॉन अब्राहम हे सह-मालक आहेत. संघात हेनरिच क्लासेन, ॲनरिक नॉर्किए, लॉगन व्हॅन बीक आणि रोलेफ व्हॅन डर मर्व्ह यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह नेदरलँड्सच्या नवोदित खेळाडूंचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लवकरच १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा; एक अब्ज पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

Air India Flight Turbulence : 'त्या' पायलटने घेतला होता गांजा

मराठे फक्त प्रचारासाठीच आहेत का? - मनोज जरांगे

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! मिसिंग लिंक आज अंशत: बंद; वाचा सविस्तर