Twitter
क्रीडा

Paris 2024 Olympics: ऐतिहासिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर; भारतीय हॉकी संघाचा आज जर्मनीशी उपांत्य सामना

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी आहे.

Swapnil S

पॅरिस : टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताची कट्टर प्रतिस्पर्धी जर्मनीशी गाठ पडणार आहे. चार वर्षांपूर्वी याच जर्मनीला नमवून भारताने कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे आता त्यांना नमवून भारतीय संघ अंतिम फेरीत धडक मारणार का, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे.

१९८०मध्ये भारताने हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर जवळपास ४१ वर्षे भारतीय हॉकी संघाला पदकाची प्रतीक्षा करावी लागली. यंदा महिलांचा संघ ऑलिम्पिकला पात्र ठरण्यात अपयशी ठरल्याने पूर्णपणे पुरुषांच्या कामगिरीवरच भारताची भिस्त होती. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या शिलेदारांनी देशवासियांना निराश न करता आतापर्यंत दिमाखदार खेळ केला आहे.

साखळी फेरीत भारताने ब-गटात दुसरे स्थान मिळवताना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांना धूळ चारली. तसेच अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले. फक्त बेल्जियमकडून भारताने एकमेव पराभव पत्करला. मग त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत केले. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मुख्य म्हणजे एका खेळाडूला लाल कार्ड दाखवण्यात आल्यावरही १० खेळाडूंसह भारताने झुंज दिली. तसेच स्पर्धेत हरमनप्रीतने ७ गोल नोंदवताना सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळे जर्मनीवरही भारतीय संघाचे नक्कीच दडपण असेल. जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाला हरवले.

उपांत्य फेरी जिंकल्यास भारताचे पदक पक्के होईल. मंगळवारीच दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेन आणि नेदरलँड्स आमनेसामने येतील. स्पेनने गतविजेत्या बेल्जियमला, तर नेदरलँड्सने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत नमवले.

रोहिदासवर एका सामन्याची बंदी

ग्रेट ब्रिटनविरुद्ध पंचांनी लाल कार्ड दाखवल्याने भारताच्या अमित रोहिदासला मैदानाबाहेर जावे लागले. त्याचा फटका भारतीय संघाला बसू शकतो. अमितवर एका सामन्याची बंदी घालण्यात आल्याने तो उपांत्य फेरीत खेळू शकणार नाही. अमितने हरमनप्रीतच्या साथीने सेट पीस तसेच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेकदा संधी निर्माण केली. भारतीय हॉकी महासंघाने अमितवरील कारवाईबाबत अपिल केली होती. मात्र आयोजकांनी ती फेटाळून लावली. ब्रिटनच्या खेळाडूशी वादविवाद करताना त्याला स्टीक लगावल्याने अमितवर कारवाई करण्यात आली.

स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत सात गोलसह भारताचा हरमनप्रीत ऑस्ट्रेलियाच्या गोव्हर्ससह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेल्याने हरमनप्रीतला त्याच्यापुढे जाण्याची संधी आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?