कॅलगरी : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने चायनीज तैपईचा अव्वल मानांकित चोऊ टाईन चेनला सरळ सेटमध्ये पराभूत करत कॅनडा ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शुक्रवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीकांतने चेनला २१-१८, २१-९ असे ४३ मिनिटांत पराभूत केले.
पहिल्या गेममध्ये श्रीकांतने आक्रमक सुरुवात करत ५-० अशी आघाडी घेतली. मात्र चेनने पुनरागमन करत १६-१६ अशी बरोबरी केली. चेनने १७-१६ अशी आघाडी घेत सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांतने पुढील सहा पैकी पाच पॉइंट्स जिंकत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने ४-४ नंतर सलग पॉइंट्स घेत ११-६ अशी आघाडी घेतली आणि नंतर १९-७ अशी आघाडी घेत सहज विजय मिळवला. किदम्बीसमोर उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या केंता निशीमोटोचे आव्हान आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एस शंकर मुथ्थुस्वामी सुब्रमणियनला ७९ मिनिटांच्या लढतीत १५-२१, २१-०५, १७-२१ असे पराभूत करत निशीमोटोने आगेकूच केली.
महिला एकेरीत श्रीयांशी वलीशेट्टीने प्रभावी खेळ केला. मात्र डेन्मार्कच्या अमेलिया शुल्झविरुद्ध पराभूत झाल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.