नार्थहॅम्पटन : अनुभवी फलंदाज के. एल. राहुलने इंग्लंड दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून देत १६८ चेंडूंत ११६ धावांची दमदार शतकी खेळी साकारली. त्यामुळे भारत-अ संघाने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात उत्तम सुरुवात केली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारत-अ संघाने ७० षटकांत ५ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली होती.
यंदा आयपीएलचा १८वा हंगाम ३ जूनपर्यंत लांबला. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मध्यंतरी १० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. अखेरीस विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावत या स्पर्धेची शानदार सांगता केली. मात्र एकीकडे आता विराटसह रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झालेला असताना आता भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.
त्यापूर्वी सराव म्हणून खेळवण्यात आलेली इंग्लंड लायन्सविरुद्धची पहिली चार दिवसीय लढत भारत-अ संघाने अनिर्णित राखली. या सामन्यात मुख्य भारतीय संघातील सहा खेळाडू होते. करुण नायरचे द्विशतक, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, नितीश रेड्डी यांची अर्धशतके हे पहिल्या सामन्यातील लक्षवेधी मुद्दे ठरले. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंड लायन्सच्या फलंदाजांनी संघर्ष करायला लावला. आता दुसऱ्या सराव सामन्यातही भारतीय फलंदाजांनी उत्तम सुरुवात केली.
यशस्वी जैस्वाल (१७) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार अभिमन्यू ईश्वरनही (११) छाप पाडू शकला नाही. ख्रिस वोक्सने या दोघांना बाद केले. मात्र २ बाद ४० अशा स्थितीतून राहुल व करुण नायर यांनी डोलारा सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचली. राहुलने १५ चौकार व १ षटकारासह शतक साकारले. तर करुणने फॉर्म कायम राखताना ४ चौकारांसह ७१ चेंडूंत ४० धावा केल्या. करुण बाद झाल्यावर राहुलने ध्रुव जुरेलसह (५२) चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. जुरेलने ७ चौकारांसह सलग दुसरे अर्धशतक साकारले.
अखेरीस जॉर्ज हीलने राहुल तसेच जुरेलचा अडसर दूर केला. त्यानंतर शार्दूल ठाकूर (१९) व नितीश रेड्डी (९) खेळपट्टीवर ठाण मांडून होते. इंग्लंडसाठी वोक्सने ३, तर जॉर्ज हीलने दोन बळी मिळवले होते.
दरम्यान, २० जूनपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी मुंबईहून भारताचा संघ इंग्लंडसाठी रवाना झाला. भारताचा मुख्य संघ आणि भारत-अ संघातही सराव सामना खेळवण्यात येणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत-अ : ७० षटकांत ५ बाद २८५ (के. एल. राहुल ११६, ध्रुव जुरेल ५२, करुण नायर ४०; ख्रिस वोक्स ३/५०)