बटुमी (जॉर्जिया) : भारताची ३८ वर्षीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने गुरुवारी महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यासह तिने कँडिडेट्स स्पर्धेचीही पात्रता मिळवली. त्यामुळे आता विजेतेपदासाठी हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्हीही भारतीय खेळाडूंमध्येच द्वंद्व रंगणार आहे. इतिहासात प्रथमच भारताच्या दोन महिलांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, हे विशेष.
२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या दोन जणींनी थेट अंतिम फेरीत मजल मारून बुद्धिबळातील देशाची ताकद सिद्ध केली आहे. नागपूरच्या १९ वर्षीय दिव्याने बुधवारी चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईला १.५-०.५ असे नमवले होते. १५वी मानांकित दिव्या ही विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती.
त्यानंतर गुरुवारी चौथ्या मानांकित हम्पीने चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईवर टायब्रेकरमध्ये ५-३ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंत पहिले दोन दिवस बरोबरी कायम होती. अखेरीस टायब्रेकरमध्ये हम्पीने बाजी मारली. त्यामुळे या दोघीही कँडिडेट्ससाठी पात्र ठरल्या आहेत.
महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून खेळाडूंना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल.