FIFA World Cup 2026 : एम्बाप्पे किसी से कम नहीं; फ्रान्स सुसाट (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : एम्बाप्पे किसी से कम नहीं; फ्रान्स सुसाट

तारांकित आक्रमणपटू किलियान एम्बाप्पेने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने इराकला ३-० असे नेस्तनाबूत करून आय-गटातून सर्वप्रथम बाद फेरी गाठली.

Swapnil S

फिलाडेल्फिया : तारांकित आक्रमणपटू किलियान एम्बाप्पेने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने इराकला ३-० असे नेस्तनाबूत करून आय-गटातून सर्वप्रथम बाद फेरी गाठली. एम्बाप्पेने सलग दुसऱ्या लढतीत दोन गोल नोंदवून ‘हम भी किसी से कम नहीं’ असे जणू दाखवून दिले.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे.

यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील. त्यामुळे आता थरार आणखी वाढत आहे.

सामन्याच्या १४व्या मिनिटाला एम्बाप्पेने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. याच वेळी फिलाडेल्फियातील लिंकन फायनान्शियल फील्डवर जोरदार पावसाला सुरुवात झाली. मैदानावर साचलेल्या पाण्यामुळे आणि वादळी परिस्थितीमुळे खेळाचा मध्यंतरावेळी तब्बल दोन तासांचा व्यत्यय आला. पावसाचा जोर कमी झाल्यावर मैदानातील पाणी काढून सामना पुन्हा सुरू करण्यात आला. एम्बाप्पेने ५४व्या मिनिटाला आपला दुसरा गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. इराकचा बचावपटू झैद तहसीन याने गोलकिपरला दिलेला चुकीचा पास उस्माने डेम्बेलेने ताब्यात घेतला आणि एम्बाप्पेला पास दिला, ज्यावर त्याने गोल नोंदवला. विश्वचषक इतिहासातील एम्बाप्पेचा हा एकूण १६वा गोल ठरला. तो आता या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याने १८ गोलसह या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. ६६व्या मिनिटाला डेम्बेलेने तिसरा गोल नोंदवून फ्रान्सचा विजय पक्का केला.

सामन्यादरम्यान इराकचा स्ट्रायकर आयमेन हुसेन याला दुखापतीमुळे २६व्या मिनिटाला मैदानातून बाहेर पडावे लागले, त्याच्या जागी अली अल-हमादी याला पाचारण करण्यात आले. फ्रान्सने या विजयासह स्पर्धेतील आपला दावेदार असल्याचा ठसा उमटवला आहे.

दोन तास खोळंबा

मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील फ्रान्स आणि इराक यांच्यातील सामना दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आला होता. स्पर्धेच्या इतिहासात खराब हवामानामुळे सामना मध्यंतरात थांबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्याच्या पूर्वार्धात फ्रान्स १-० अशी आघाडीवर असताना मध्यंतराच्या वेळी पावसामुळे व्यत्यय आला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यामुळे लिंकन फायनान्शियल फील्डवरील प्रेक्षकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात आले होते. पावसामुळे मैदानावर पाणी साचले होते, ते काढण्यासाठी कर्मचारी वर्गाला मेहनत घ्यावी लागली. फिफाच्या नियमानुसार, ८ मैलांच्या परिसरात वीज चमकल्यास सामना ३० मिनिटांसाठी थांबवला जातो. प्रत्येक नवीन वीज पडल्यावर ही वेळ पुन्हा रिसेट केली जाते. जवळपास पावणेदोन तास वाट पाहिल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले, तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली. त्यानंतर रात्री ८ वाजता सामना पुन्हा सुरू झाला.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग