(Photo-X/@India_AllSports)
क्रीडा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य, उन्नती यांची विजयी सलामी; नवी दिल्लीतील स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा

भारताचा तारांकित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि उदयोन्मुख उन्नती हूडा यांनी सुरुवातीचा अडथळा पार करत बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा तारांकित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि उदयोन्मुख उन्नती हूडा यांनी सुरुवातीचा अडथळा पार करत बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या पदरी निराशा पडली. मात्र महिला दुहेरीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत लक्ष्यने बल्गेरियाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलीमन याचा ४५ मिनिटे चाललेल्या सामन्यात १६-२१, २१-८, २१-४ असा पराभव केला. आता दुसऱ्या फेरीत लक्ष्यची गाठ अमेरिकेच्या गॅरेट टॅनशी पडणार आहे, ज्याने स्वित्झर्लंडच्या टोबियास कुएंझीचा २१-४, २१-१५ असा पराभव केला.

महिला दुहेरीत बिगरमानांकित भारतीय जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी १६व्या मानांकित अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अ‍ॅलिसन क्विन ली या जोडीचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले. ट्रीसा आणि गायत्रीने अवघ्या ३८ मिनिटांत हा सामना २१-१५, २१-१२ असा सरळ गेममध्ये जिंकला. मात्र, दुसरी भारतीय महिला दुहेरी जोडी कविप्रिया सेल्बम आणि सिमरन सिंगी यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. त्यांना बल्गेरियाच्या नवव्या मानांकित गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टेफानी स्टोएव्हा या जोडीकडून ७-२१, १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

मिश्र दुहेरीच्या प्रकारात भारतासाठी मंगळवारचा दिवस निराशाजनक ठरला. रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गड्डे या जोडीला कॅनडाच्या जोनाथन बिंग त्सान लाई आणि क्रिस्टल लाई या जोडीकडून २२-२०, १९-२१, १७-२१ असा संघर्षपूर्ण पराभव पत्करावा लागला. तर आशिथ सूर्या आणि अमृता प्रमुथेश ही जोडी तुर्कस्तानच्या इमरे सोन्मेझ आणि यासेमेन बेक्तास या जोडीकडून २१-१६, २९-३०, २२-२४ अशी पराभूत झाली. या प्रकारात आता भारताचे एकमेव आव्हान १५व्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीच्या रूपाने शिल्लक आहे. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर ही जोडी दुसऱ्या फेरीत मकाऊच्या आयोक चॉंग लिआँग आणि वेंग ची एनजी यांच्याशी भिडणार आहे.

दरम्यान, भारताची उगवती महिला एकेरी शटलर उन्नती हुड्डा हिने म्यानमारच्या थेट हतार थुझार हिचा ४० मिनिटांत २२-२०, २१-१६ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली. उन्नतीची पुढील लढत कॅनडाच्या १३व्या मानांकित मिशेल ली हिच्याशी होणार आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सोमवारपासून जागतिक स्पर्धेच्या ३०व्या पर्वाला प्रारंभ झाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...