क्रीडा

अखेर मेस्सीचा भारत दौरा ठरला; डिसेंबरमध्ये चार शहरांना देणार भेट

अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. डिसेंबर महिन्यात मेस्सी भारतातील चार शहरांना भेट देणार आहे.

Swapnil S

कोलकाता : अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. डिसेंबर महिन्यात मेस्सी भारतातील चार शहरांना भेट देणार आहे. यामध्ये कोलकाता, अहमदाबाद, मुंबई व नवी दिल्लीचा समावेश आहे. १२ डिसेंबरला मेस्सीचे कोलकाता येथे आगमन होणार आहे, तर १५ डिसेंबरला तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पुन्हा मायदेशी परतेल.

३८ वर्षीय मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने २०२२मध्ये फिफा विश्वचषक उंचावला. मेस्सीचे जगभरात कोट्यवधी चाहते असून भारतही यामध्ये मागे नाही. कोल्हापूरपासून ते केरळपर्यंत मेस्सीचे चाहते पसरलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी जेव्हा या दौऱ्याची घोषणा झाली, तेव्हा अर्जेंटिनाचा संपूर्ण संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा होती. मात्र फक्त मेस्सीच भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच केरळ राज्य शासनाने तारखांची जुळवाजुळव न झाल्याने माघार घेतली. त्यामुळे मेस्सी ५ ऐवजी ४ शहरांना भेट देणार आहे. या दौऱ्याचा प्रचारकर्ता सतद्रू दत्ताने याविषयी माहिती दिली.

मेस्सीच्या या दौऱ्याला ‘गोट टूर ऑफ इंडिया’ असे नाव देण्यात आले असून लवकरच संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. मेस्सी यापूर्वी २०११मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. त्यानंतर आता १४ वर्षांनी मेस्सी पुन्हा भारतात येणार आहे.

१२ डिसेंबरला कोलकाता येथे आगमन झाल्यानंतर मेस्सी एका फिश फेस्टिव्हलला भेट देणार आहे. तसेच सॉल्ट लेक किंवा ईडन गार्डन्स स्टेडियमबाहेर मेस्सीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, टेनिसपटू लिएंडर पेस, फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांच्यासह मेस्सी ‘गोट कप’ अंतर्गत एक फुटबॉल सामना खेळणार आहे. १३ तारखेला मेस्सी अहमदाबादला दाखल होईल. येथील कार्यक्रमाची रुपरेषा नंतर जाहीर करण्यात येईल.

मुंबईत कधी?

१४ तारखेला मेस्सी मुंबईत येणार असून त्याचा प्रथम बेब्रॉर्न स्टेडियमवर विशेष सोहळा होईल, तर त्याच दिवशी वानखेडे स्टेडियमवर मेस्सी आणखी एक फुटबॉल सामना खेळेल. यासाठी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व बॉलिवूड अभिनेत शाहरूख खान यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे समजते. १५ तारखेला मग मेस्सीला पंतप्रधांनाची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाईल. त्यावेळी विराट कोहली व शुभमन गिल येण्याची शक्यता आहे.

राज्यात पाच दिवस मुसळधार; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, अलर्ट जारी

१० थरांचा थरथराट! कोकण नगर पथकाचे ठाण्यात विश्वविक्रमी १० थर; घाटकोपरमध्ये जयजवान गोविंदा पथकाचीही १० थरांची सलामी

Mumbai : गाढ झोपेत असतानाच कोसळली दरड; बाप-लेक जागीच ठार, मुसळधार पावसामुळे विक्रोळीत दुर्घटना

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट !मानखुर्दमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, १४ वर्षीय तरुण टेम्पोतून पडून मृत्यूमुखी

अलास्कामध्ये झाली बहुचर्चित ट्रम्प-पुतिन भेट; ३ तासांच्या चर्चेत काय ठरलं?