क्रीडा

लाँगव्हिजन : ‘देर न हो जाए...’

यशोदत्त पटेकर

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला आता अपेक्षित रंग चढू लागला आहे. अनेक सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार होत आहेत. परंतु काही सामने पूर्वनियोजित वेळेत पूर्ण होत नसल्याने काहीसा रंगाचा बेरंग होत आहे. घरी जाण्यासाठी शेवटची गाडी हुकू नये म्हणून ‘देर न हो जाए, कहीं देर न हो जाए...’ असे स्टेडियममधील प्रेक्षकांना वाटण्याइतपत काही सामने लांबत आहेत. सामने संपण्यास विलंब लागत असल्याने प्रेक्षकांच्या संयमाचा अंतच पाहिला जात आहे, खरोखरच!

वास्तविक, सायंकाळी ७.३० पासून सुरू होणारा सामना रात्री १०.५० वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. तरीसुद्धा सामने रात्री ११.३० पर्यंत लांबत आहेत. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामना तर ११.४७ वाजेपर्यंत सुरू राहिला. सामना ११ वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा बहुतांश प्रेक्षकांना असते. कारण प्रत्येकाला रात्री लवकर घरी पोहोचायचे असते. सहकुटुंब सामना पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांची तर मोठीच अडचण होत आहे.

इतकेच कशाला? प्रिंट मीडियासुद्धा यामुळे हवालदिल झाला आहे. वेळेत बातमी पानावर लागून छपाई निर्धारित वेळेत होऊ शकली नाही; तर अंक वाचकांपर्यंत पोहोचणार कसा? ज्या प्रिंट मीडियामुळे या सर्वात मोठ्या लीगला मोठी प्रसिद्धी मिळते, त्या माध्यमाचा संबंधितांनी व्यवहार्य दृष्टिकोनातून विचार करणे अत्यंत जरुरीचे आहे, खचितच.

सामना संपण्यास अक्षम्य विलंब होत असल्याने ब्रॉडकास्टरनाही मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या बहुतेक सर्वच सामन्यांमध्ये एकही डाव नियोजित वेळेत संपलेला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर एका तासात १४ ऐवजी केवळ १० षटकेच टाकली होती. आता बोला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर एका तासात १४ ऐवजी केवळ १० षटकेच टाकली, तेव्हा ‘सिर्फ दस? अब टाइमपास बस्स’ असेच वाटून गेले. बंगळुरूविरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा डाव सर्वात जास्त वेळ चालला, तेव्हा उपस्थितांची चुळबूळ वाढली नसेल, तरच नवल. झटपट क्रिकेट म्हणून ओळख असलेल्या टी-२० क्रिकेटची ही अशी कटकट! झटपट फॉरमॅटची मेगा-टुर्नामेंट समजल्या जाणाऱ्या आयपीएल लीगमध्ये तरी निदान अशा कूर्मगतीची अपेक्षा नाही.

प्रेक्षकांना, पत्रकारांना, ब्रॉडकास्टरना सामन्याच्या सनसनाटी समाप्तीऐवजी वेगळाच अनपेक्षित ‘अंत’ पाहायला लागू नये, हीच किमान अपेक्षा आहे. सामना चित्तथरारक होत असेल, तर निकालासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा रास्त आहे; पण एकतर्फी सामन्यासाठी ताटकळत बसावे लागण्याचा प्रकार म्हणजे निरपराधांवर लादलेली अप्रत्यक्ष शिक्षाच म्हणा ना! खेळ रंगत नसेल आणि निर्धारित वेळेपेक्षा सामना लांबत असेल तर खेळाडूही उबगून जाऊ शकतात, खचितच. याबाबत चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट‌्स यांच्यातील सामन्यादरम्यान जोस बटलरने सोशल मीडियावर बोलकी पोस्ट टाकली होती. त्याने उद्विग्न होऊन लिहिले होते की, ''कृपया या खेळाचा वेग वाढवा.'' तेव्हा सोनारानेच कान टोचले, हे बरे झाले! या सामन्याचा पहिला डाव एक तास आणि ४८ मिनिटांत संपला होता. वास्तविक, डाव संपण्याचा नियोजित कालावधी एक तास ३० मिनिटे इतका आहे. तरीही सायंकाळी ७.३० वाजता सुरू झालेला सामना रात्री ११.३० पर्यंत रेंगाळला, याला काय म्हणावे? सामन्याचा नव्हे; तर सर्वांच्याच सहनशीलतेचा अंतच ना! याबाबत यापुढे कोणीच दखल घेणार नसेल तर परमेश्वरालाच विनवावे लागेल, ‘नको देवराया अंत असा पाहू...’. सामना संपण्यास उशीर झाल्यास खेळाडूंनाही खूप त्रास होण्याची शक्यता असते. कारण सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ, टीम मीटिंग होणार असते. मग हॉटेलवर पोहोचण्यास रात्रीचे दोन ते तीन वाजतात. एवढ्या उशिरा पोहोचल्यावर खेळाडू झोपणार कधी? कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाचा दिवस असतो. सामना खेळण्यासाठी संघांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. याचीही कोणाला काळजी वाटत नाही.

यंदाच्या आयपीएल हंगामात कोणताही डाव निश्चित वेळेत संपलेला नाही. नियमांनुसार सामना तीन तास २० मिनिटांत संपत नसल्याने अधिकृत ब्रॉडकास्टरचे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत असतानाही कोणीच कसे या दिरंगाईकडे गांभीर्याने पाहत नाही? कहर म्हणजे, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादेत झालेला उद्घाटनीय सामना तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता. पहिलावहिला सामना म्हणून कोणीही त्यावेळी कसलीच कुरबूर केली नव्हती. कारण त्याआधी उद्घाटनाचा रंगारंग सोहळा पार पडला होता ना! उद्घाटन सोहळ्यामुळे सामना काहीसा उशिरा सुरू झाला होता. आतापर्यंतच्या बहुतांश सामन्यातील डाव शंभर मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालले. तेव्हा ‘हद हो चुकी है...’ असेच म्हणायला हवे. नियमांनुसार २० षटके ९० मिनिटांत टाकायची असतात. गुजरात-चेन्नई सामन्यातील पहिला डाव १२० मिनिटे चालला; तर दुसरा डाव १०३ मिनिटे इतका लांबला.

पंजाब-कोलकाता सामन्याचा पहिला डाव १०३; तर दुसरा डाव ८६ मिनिटे सुरू राहिला. मोहालीतील बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आधी फ्लड लाईटमधील तांत्रिक बिघाड आणि नंतर पाऊस यामुळे खेळात व्यत्यय आला. मग पंजाब किंग्जचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे विजय झाला. कोलकाता नाईट रायडर्सला सात धावांनी हार पत्करावी लागली. विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाताने १६ षटकांत ७ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारलेली असतानाच वरुणराजाचे आगमन झाले. त्यावेळी कोलकाता पंजाबपेक्षा सात धावांनी मागे होता. पाऊस थांबण्याची शक्यता नसल्याने डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल झाला. विजयाची आस लावून बसलेल्या कोलकाता संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर मग ‘सारे वादे-इरादे बरसात आ के, धो जाती है...’ असेच भाव उमटले असणार, हमखास.

लखनऊ-दिल्ली सामन्याचे डाव अनुक्रमे १०७ आणि ११२ मिनिटे सुरू राहिले. हैदराबाद-राजस्थान सामन्याचाही पहिला डाव १०७ मिनिटे आणि दुसरा डाव ११२ मिनिटे सुरू राहिला. तेव्हा तर चक्क ‘बाराची गाडी निघाली... जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...’ असे म्हणण्यासारखीच वेळ प्रेक्षकांवर ओढवली होती, असे म्हटले तरी ते अप्रस्तुत ठरणार नाही. नाही म्हणायला, बंगळुरू-मुंबई सामन्यातील पहिला डाव १२२ आणि दुसरा डाव ७८ मिनिटांत आटोपल्यानंतर प्रेक्षकांना काहीसे हायसे वाटले असणार. चेन्नई-लखनऊ यांच्यातील सामना मैदानावर आलेल्या श्वानामुळे पाच मिनिटे उशिराने सुरू झाला होता, हेही विशेषच.

आयसीसीच्या नियमानुसार एका तासात सुमारे १४ षटके टाकणे बंधनकारक असल्याने आयपीएलमधील स्लो ओव्हर रेट ही सततची डोकेदुखी थांबविण्यासाठी गेल्या वर्षीपासून दंडाची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार जर ९० मिनिटांत २० षटके पूर्ण झाली नसतील; तर उर्वरित षटकांत पाचऐवजी चारच खेळाडू ३० यार्डाच्या बाहेर ठेवता येतात. यामुळे फलंदाज लॉन्ग शॉट खेळू शकत असल्याने फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होत असतो. सध्या सुरू असलेल्या हंगामात हा दंड केवळ चेन्नई संघाला लखनऊविरुद्धच्या सामन्यात झाला. इतर सामन्यांत दंड ठोठावण्यासाठी पंचांना ठोस कारण मिळाले नाही, म्हणे! अर्थात स्लो ओव्हर रेटचे कारण डीआरएसचा वेग कमी असणे, हेही असू शकते, म्हणा!

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात २० षटकांचा कोणताही डाव नियोजित वेळेत पूर्ण न होण्यास डावादरम्यान घेतला जाणारा पाच मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आऊट ब्रेक हेही एक कारण असू शकेल, कदाचित. त्यात काही नवे नियम करण्यात आल्यानेसुद्धा ब्रेकचा कालावधी वाढत आहे. एखादा सामना अपवादाने उशिरा संपला तर ठीक आहे, पण प्रत्येक सामन्याला उशीर झाला; तर सर्वांचाच खोळंबा होतो. पुन्हा एखाद्या सामन्यात सुपर ओव्हर होण्याची शक्यता असेल, तर सामना पुन्हा ३० मिनिटांनी वाढण्याचा संभव असतो. तेव्हा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने याची गंभीर दखल घ्यायला हवी. ‘हर बात का वक्त मुकर्रर है हर काम की सात (बहुमोलता) होती है, हर काम की सात होती है...’ हे गव्हर्निंग कौन्सिलसह साऱ्यांनीच ध्यानात घ्यायला हवे.

आता प्रेक्षकांसाठी नाही; तर किमान खेळाडू आणि ब्रॉडकास्टरसाठी तरी सामना लवकर संपविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे. आयपीएलचे सामने उशिरा संपल्याने ब्रॉडकास्टरना नुकसान सोसावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्री पाऊणे अकरानंतर टीव्ही रेटिंग कमी होत असल्याचे अधिकृत ब्रॉडकास्टरच्या निदर्शनास आले आहे. रात्री अकरानंतर टीव्ही रेटिंग वेगाने घटत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत सामने बघत नाहीत, हेच यावरून स्पष्ट होत आहे. ‘वक्त गया तो बात गयी बस वक्त की किमत होती है...’ हे सर्वसामान्यांना जसे कळते, तसे आयपीएलच्या आयोजकांना का कळत नाही? तेव्हा घरी बसून आयपीएल पाहणाऱ्यांची रुची टिकवून ठेवत आयपीएलच्या लोकप्रियतेला ओहोटी लागू नये, म्हणून खडबडून जागे होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आयपीएल सामन्यांची वेळ जशी रात्री आठवरून ७.३० करण्यात आला, तशी ती आणखी अलीकडे म्हणजे ७.०० वाजताची आणि डबल हेडरच्या पहिल्या सामन्याची वेळ ३.०० वाजताची केली पाहिजे. खेळाडू, प्रेक्षक, मीडिया, पोलीस, विक्रेते, संबंधित कामगार आणि ब्रॉडकास्टर या सर्वच घटकांसाठी हे व्यवहार्य ठरेल, निश्चितच.

yashodattpatekar@gmail.com

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण