क्रीडा

मध्य प्रदेशची पकड आणखी मजबूत,पहिल्याच डावात १६२ धावांची आघाडी

वन-डे क्रिकेटप्रमाणे पाचव्या दिवशी खेळ झाला, तरच मुंबईला विजयाची अपेक्षा ठेवता येणार आहे

वृत्तसंस्था

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी मध्य प्रदेशने आपली पकड आणखी मजबूत करताना पहिल्या डावात १६२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात २ बाद ११३ धावा केल्या. अरमान जाफर आणि सुवेद जाफर हे अनुक्रमे ३० आणि ९ धावांवर नाबाद आहेत. मुंबई अद्याप ४९ धावांनी पिछाडीवर असली, तरी मुंबईने पिछाडी भरून काढत आव्हानात्मक आघाडीकडे वाटचाल करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे दिसत आहे. वन-डे क्रिकेटप्रमाणे पाचव्या दिवशी खेळ झाला, तरच मुंबईला विजयाची अपेक्षा ठेवता येणार आहे.

मुंबईने १६२ धावांच्या पिछाडीवरून दुसऱ्या डावाला सुरुवात केल्यानंतर हार्दिक तामोरे २५ धावांवर कुमार कातिर्केयच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर कर्णधार पृथ्वी शॉ जम बसलेला असतानाच गौरव यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शॉने ५२ चेंडूंत ४४ धावा करताना दोन षट्कार आणि तीन चौकार लगावले. १६ षट्कांत २ बाद ८३ अशी अवस्था झाल्यानंतर जाफर आणि पारकर यांनी खेळ संपेपर्यंत नाबाद राहत किल्ला लढविला.

मध्य प्रदेशचा पहिला डाव ५३६ धावात संपुष्टात आला. चौथ्या दिवशी मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले. त्याच्या या शतकामुळे मध्य प्रदेशची पहिल्या डावातील आघाडी वाढण्यास मोठा हातभार लागला. सारांश जैनने ५७ धावांची अर्धशतकी खेळी करत आघाडी भक्कम करण्यात मोलाचे योगदान दिले. मुंबईने पहिल्या डावात केलेल्या ३७४ धावांना उत्तर देताना मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबे (१३३), शुभम शर्मा (११६) यांनी तिसऱ्याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थिती नेले होते.

चौथ्या दिवशी मुंबईवर आघाडी घेण्यासाठी मध्य प्रदेशला अवघ्या सात धावांची गरज होती. तिसऱ्या दिवसअखेर रजक पाटीदार अर्धशतक करून नाबाद होता. या अर्धशतकाला रजतने शतकात रूपांतरित केले. त्याच्या या शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने उपाहारापर्यंत सहा बाद ४७५ धावांपर्यंत मजल मारली. मात्र दुसऱ्या सत्रात पाटीदार १२२ धावांवर बाद झाला. त्यानंतर सारांश जैनने ५७ धावांची खेळी करत आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. अखेर मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव ५३६ धावात संपुष्टात आणला. दरम्यान, ४१ वेळा रणजी करंडक विजेतेपदे पटकाविणाऱ्या मुंबईसाठी मध्य प्रदेशची वाढती आघाडी हे मोठे आव्हान ठरणार आहे.

सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुंबईला मध्य प्रदेशचा पहिला डाव गुंडाळणे गरजेचे होते; मात्र मुंबईला चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत अवघ्या तीन विकेट्स घेता आल्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अखेर मध्य प्रदेशला रोखण्यात यश मिळविले. मुंबईकडून शम्स मुल्लानीने पाच विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडेने तीन, तर मोहित अवस्थीने दोन विकेट्स घेतल्या.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत