ANI
क्रीडा

Lionel Messi: अखेर अमेरिकेत मेस्सीची मॅजिक! कॅनडाला २-० असे नमवून अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

Copa America Football 2024: कर्णधार लिओनेल मेस्सीला अखेर निर्णायक क्षणी सूर गवसला. मेस्सी आणि जुलियन अल्वारेझ यांनी केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना कॅनडाला २-० असे नामोहरम केले.

Swapnil S

ईस्ट रुदरफोर्ड : कर्णधार लिओनेल मेस्सीला अखेर निर्णायक क्षणी सूर गवसला. मेस्सी आणि जुलियन अल्वारेझ यांनी केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना कॅनडाला २-० असे नामोहरम केले.

मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गतविजेत्या अर्जेंटिनाचेच पारडे जड मानले जात होते. तब्बल ८० हजारांहून अधिक स्पर्धकांनी या लढतीसाठी स्टेडियम गाठले. अल्वारेझने २२व्या मिनिटाला रॉड्रिगो पॉलच्या पासवर अप्रतिम गोल झळकावून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत ही आघाडी त्यांनी कायम राखली.

मग दुसऱ्या सत्रात ५१व्या मिनिटाला एंझो फर्नांडीसच्या पासला हळूच स्पर्श करून मेस्सीने संघासाठी दुसरा गोल नोंदवत विजय पक्का केला. मेस्सीला या स्पर्धेतील २ साखळी सामन्यांत एकही गोल करता आला नव्हता. तसेच उपांत्यपूर्व लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्येही तो अपयशी ठरला होता. मात्र बुधवारी अखेर त्याने या स्पर्धेतील पहिला व कारकीर्दीतील १०९वा गोल नोंदवून सूर गवसल्याचे संकेत दिले. आता सोमवारी पहाटे होणाऱ्या अंतिम लढतीत अर्जेंटिनासमोर उरुग्वे विरुद्ध कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

मेस्सी दुसऱ्या स्थानी

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेस्सीने बुधवारी दुसरे स्थान मिळवले. मेस्सीच्या नावावर आता १८६ सामन्यांत १०९ गोल आहेत. त्याने इराणच्या अली डे यांचा १०८ गोलचा विक्रम मोडीत काढला. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (२१२ सामन्यांत १३० गोल) या यादीत अग्रस्थानी आहे. विशेष म्हणजे २०२१च्या कोपा अमेरिकापासून गेल्या २५ सामन्यांत मेस्सीने अर्जेंटिनासाठी २८ गोल नोंदवले आहेत.

अर्जेंटिनाला सलग तिसरे आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळवण्यासह स्पेनच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी आहे. स्पेनने २००८मध्ये युरो, २०१०मध्ये फिफा विश्वचषक, तर २०१२मध्ये पुन्हा युरो चषकाचे जेतेपद मिळवले होते. अर्जेंटिनाने २०२१मध्ये कोपा अमेरिका, तर २०२२मध्ये फिफा विश्वचषक उंचावला. त्यामुळे ते आता हॅटट्रिक साकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी