विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघदेखील रविवारी जाहीर करण्यात आला. अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवण्यात आले असून सलामीवीर पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
ऋतुराजने नुकताच आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तर मुश्ताक अली व रणजी स्पर्धेत चमक दाखवल्यानंतर पृथ्वीला आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले. आता हे दोघेही विजय हजारे स्पर्धेतही छाप पाडण्यास आतुर असतील. विकी ओस्तवाल, अर्शीन कुलकर्णी, सचिन धस, प्रशांत सोलंकी या खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष असेल.
मुंबईच्या संघात रोहित शर्मा
दुसरीकडे, भारताचा तारांकित फलंदाज रोहित शर्माचा पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. जायबंदी श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे यांना स्थान लाभलेले नाही. ३८ वर्षीय रोहित सध्या कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झालेला असून फक्त एकदिवसीय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो सिक्कीम आणि उत्तराखंड या संघांविरुद्ध पहिले दोन साखळी सामने खेळणार आहे.
रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेला प्रारंभ होईल. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), पृथ्वी शॉ, अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, सौरभ नवाळे, विकी ओस्तवाल, जलज सक्सेना, रामकृष्णा घोष, रजनीश गुरबानी, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, निखिल नाईक, प्रदीप गंधे, सिद्धार्थ म्हात्रे, सचिन धस, सत्यजीत बच्छाव.