नवी दिल्ली: कझाकस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरने कांस्यवेध साधला. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हे यश मिळवले. तसेच सांघिक प्रकारातही मनू, पलक व सुरुची सिंग यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी पुरुषांच्या पिस्तूल सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकले होते. अनमोल (५८०), आदित्य मालरा (५६९) व सौरभ चौधरी (५७६) यांच्या त्रिकुटाने एकूण १,७३५ गुणांसह ही कामगिरी बजावली. चीनच्या त्रिकुटाने सुवर्ण काबिज केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनूने पदकसंख्येत भर घातली.
२३ वर्षीय मनूने गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकण्याची किमया साधली होती. आता आशियाई स्पर्धेतही तिने कांस्य जिंकले. मनूने आठ जणींच्या अंतिम फेरीत २१९.७ गुण मिळवले. चीनच्या क्वेन मियाने २४३ गुणांसह सुवर्ण, तर कोरियाच्या किम जीनने २४१ गुणांसह रौप्य जिंकले.
त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूलमधील सांघिक प्रकारात मनू, पलक व सुरुची यांच्या महिला त्रिकुटाने एकूण १,५६२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. एकेरी गटात सुरुची व पलकला अंतिम फेरी गाठता आली नाही.
सध्या भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ३ पदके जिंकली असून यामध्ये १ रौप्य व २ कांस्यपदकांचा समावेश आहे. एकंदर या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून येत्या काही दिवसांत या पदकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कनिष्ठ गटात रश्मिकाला सुवर्ण
भारताच्या रश्मिका सहगलने कनिष्ठ गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. रश्मिकाने २४१.९ गुणांची कमाई केली. दुसऱ्या क्रमांकावरील हॅन कोंगने २३७ गुण मिळवले. भारतासाठी हे कनिष्ठ विभागातील पाचवे सुवर्ण ठरले. रश्मिकाने सांघिक प्रकारात मोहिनी व वंशिका चौधरी यांच्या साथीनेही सुवर्ण काबिज केले.
रश्मिकाने ५८२, मोहिनीने ५६५, तर वंशिकाने ५७३ गुण मिळवले. कनिष्ठ विभागात भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली आहेत. आणखी पदके येत्या काही दिवसांत अपेक्षित आहेत.