भुवनेश्वर : कर्णधार हरमनप्रीत सिंगने केलेल्या निर्णायक दोन गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. या विजयासह भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान काबिज केले.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये उभय संघांत ही लढत झाली. या लढतीद्वारे भारतातील प्रो लीग टप्पा समाप्त झाला. आता जून महिन्यात पुढील टप्प्यातील सामने सुरू होतील. दोन दिवसांपूर्वीच इंग्लंडकडून भारताने पराभव पत्करला होता. मात्र बुधवारी त्याचा वचपा घेत भारताने सरशी साधली. भारताच्या खात्यात ८ सामन्यांतील ५ विजयांचे १५ गुण आहेत. इंग्लंड १६ गुणांसह पहिल्या, तर बेल्जियमही १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. प्रो लीगचा विजेता २०२६च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल.
भारतासाठी हरमनप्रीतने २६व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र ३०व्या मिनिटाला कोनोर विल्यम्सनने इंग्लंडला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर तिसऱ्या सत्रात मात्र लगेचच (३२व्या मिनिटाला) हरमनप्रीतने वैयक्तिक व संघासाठीही दुसरा गोल झळकावला. त्यानंतर इंग्लंडला बरोबरी साधता न आल्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.