(Photo - FPJ) 
क्रीडा

भारत हा फुटबॉलप्रेमींचा देश : लिओनेल मेस्सी; डिसेंबरमधील भारत दौऱ्याची केली घोषणा

भारतातील गोट टूरमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा जगातील स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गुरुवारी केली.

Swapnil S

कोलकाता : भारतातील गोट टूरमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा जगातील स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गुरुवारी केली. भारत हा फुटबॉलप्रेमींचा देश असून पुन्हा या देशाचा दौरा करायला मिळणे हा माझा सन्मान असल्याचे मेस्सी म्हणाला. १४ वर्षांपूर्वी मेस्सी भारतात आला होता.

भारत हा खास देश आहे. १४ वर्षांपूर्वी मी भारताचा दौरा केला होता. त्यावेळच्या आठवणी आजही लक्षात आहेत. तेथील चाहते विलक्षण असल्याचे मेस्सी म्हणाला. भारत हा फुटबॉल चाहत्यांचा देश आहे. येथील नव्या पिढीतील चाहत्यांना भेटायला मला आवडेल. त्यांच्यासोबत फुटबॉलशी संबधित चर्चा करायला मला अवडतील, असे मेस्सी म्हणाला.

१५ ऑगस्ट रोजी आयोजकांनी मेस्सीच्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. गुरुवारी स्वत: मेस्सीने प्रथमच व्यक्त होत भारत दौऱ्यावर शिक्कामोर्तब केले. कोलकातामधील मेस्सीचा कार्यक्रम सॉल्ट लेक स्टेडियममध्ये होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. हेच स्टेडियम २०११ मध्ये मेस्सीच्या भारत भेटीचे साक्षीदार होते.

कोलकात्यात मेस्सी गोट कॉन्सर्ट्स आणि गोट कपसाठी मैदानात उतरेल. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, बायचुंग भूतिया आणि लिएंडर पेस उपस्थित असतील.

मेस्सीच्या या दौऱ्याला कोलकातापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेट देणार आहे. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कोलकाता येथील ‘गोट कॉन्सर्ट’ आणि ‘गोट चषक’ लढत १३ डिसेंबरला सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता भारतातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

१३ डिसेंबरला दौऱ्याला सुरुवात

१३ डिसेंबरपासून मेस्सीच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी मेस्सी कोलकाता, अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांना भेट देईल. १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मेस्सीचा हा दौरा संपेल.

या कार्यक्रमांत होणार सहभागी

दौऱ्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी भारतातील विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहे. त्यात कॉन्सर्ट्स, चाहत्यांशी भेट, खाद्य महोत्सव, फुटबॉल मास्टरक्लासेस आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पॅडल टेनिसचे प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल.

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती; ‘फ्री प्रेस हाऊस’मध्ये भरला नवकलाकारांचा मेळा

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र