क्रीडा

MI vs KKR : मुंबईच्या फलंदाजांसाठी वानखेडे ठरणार 'लकी'? कोलकाताशी आज तिसरा सामना; रोहितच्या कामगिरीकडे लक्ष

पाच वेळा आयपीएलचा किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला अपेक्षेप्रमाणे यंदाच्या हंगामातही पहिल्या विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Swapnil S

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

पाच वेळा आयपीएलचा किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला अपेक्षेप्रमाणे यंदाच्या हंगामातही पहिल्या विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे सलग दोन पराभव पत्करल्यानंतर आता सोमवारी घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळताना मुंबईच्या फलंदाजांची बॅट तळपेल, अशी चाहत्यांना आशा आहे. आयपीएलमध्ये सोमवारी मुंबईची कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार आहे. या लढतीत प्रामुख्याने रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने अनुक्रमे चेन्नई व गुजरात यांच्याकडून पराभव पत्करले आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही सामन्यांत मुंबईच्या एकाही फलंदाजाने अर्धशतकसुद्धा झळकावलेले नाही. तसेच मुंबईला दोन्ही लढतींमध्ये १६० धावांचा पल्लाही गाठता आला नाही. यामध्ये अनुभवी सलामीवीर रोहितचे अपयश सातत्याने मुंबईला महागात पडत आहे. चेन्नईविरुद्ध ४ चेंडूंत शून्यावर बाद झाल्यावर रोहितने गुजरातविरुद्ध ४ चेंडूंत फक्त ८ धावा केल्या. रोहितवर मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. मात्र तो आयपीएलमध्ये फारसा गंभीरपणे खेळताना आढळत नाही. त्यामुळेच रोहित किमान वानखेडेवरील फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर आक्रमक सुरुवात करण्यासह खेळपट्टीवर ठाण मांडेल, असे अपेक्षित आहे.

दुसरीकडे मुंबईच्याच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने २ पैकी १ लढत जिंकली आहे. बंगळुरूकडून पराभव पत्करल्यानंतर कोलकाताने दुसऱ्या सामन्यात राजस्थानला धूळ चारली. तसेच गतवर्षी कोलकाताने वानखेडेवर मुंबईला नमवले होते. त्यामुळे मुंबई त्या पराभवाचा वचपा घेण्यास आतुर असेल. उभय संघांत आयपीएलमध्ये झालेल्या ३४ सामन्यांपैकी मुंबईने २३, तर कोलकाताने ११ लढती जिंकल्या आहेत. मात्र सध्याचा फॉर्म पाहता कोलकाताचे पारडे जड आहे, असे म्हणता येईल.

वानखेडेच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे गेले आहे. येथे दवसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारू शकतो. मात्र येथे पॉवरप्लेमध्ये वेगवान गोलंदाजांचे चेंडू बऱ्यापैकी स्विंग होतात. एकूणच चाहत्यांना रंगतदार लढत पाहायला मिळेल. मुंबईचे पहिल्या, तर कोलकाताचे दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकेलटन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक