जयपूर : इंडियम प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी ऐन सायंकाळी कोणता सूर्य तळपणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर गुरुवारी सलग पाच विजय नोंदवणारा मुंबई इंडियन्सचा संघ लय गवसलेल्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. एकीकडे राजस्थानचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा लक्ष वेधण्यास आतुर आहे, तर दुसरीकडे मुंबईचा अनुभवी सूर्यकुमार यादव कामगिरीत सातत्य राखून आणखी एक चमकदार खेळी साकारण्यास सज्ज आहे. त्यामुळेच या लढतीकडे दोन सूर्यांमधील जुगलबंदी म्हणूनही पाहिले जात आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ १० सामन्यांतील ६ विजयांच्या १२ गुणांसह अव्वल ४ संघांत स्थान टिकवून आहे. पहिल्या पाचपैकी फक्त १ सामना जिंकणाऱ्या मुंबईने त्यानंतर सलग पाच विजय मिळवले आहेत. त्यामुळे आता बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित ४ पैकी किमान २ ते ३ लढती जिंकणे गरजेचे आहे. त्यातच मुंबईसाठी या हंगामात सर्वाधिक ४२७ धावा करणारा सूर्यकुमार ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी आहे. अशा स्थितीत सूर्यकुमारकडून मुंबईकरांना पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी अपेक्षित आहे.
दुसरीकडे जायबंदी संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करत आहे. सलग पाच लढतींमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर गेल्या लढतीत राजस्थानने जयपूर येथेच गुजरातचा सहज धुव्वा उडवला. याचे श्रेय हे १४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभवला जाते. वैभवने आयपीएल इतिहासातील सर्वात युवा शतकवीर ठरण्याचा मान मिळवतानाच राजस्थानला पुन्हा एकदा विजयपथावर आणले. त्यामुळे आता १० सामन्यांतील ३ विजयांच्या ६ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेल्या राजस्थान संघाकडून चाहत्यांना भरारीची अपेक्षा आहे.
दरम्यान, मानसिंह स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या ३ सामन्यांत दोन वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ सहज जिंकला आहे. येथे दवही मोलाची भूमिका बजावते. फिरकीपटूंना येथे अधिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टी पाटा राहण्याची शक्यता असल्याने वेगवान गोलंदाजांचा कस लागेल.
आघाडीच्या फळीवर राजस्थानची भिस्त
राजस्थान संघ प्रामुख्याने वैभव, मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणा या आघाडीच्या तीन फलंदाजांवर अवलंबून आहे. पराग, ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायर यांना गेल्या काही लढतींमध्ये अपेक्षेनुसार खेळ उंचावता आलेला नाही. दुखापतीमुळे सॅमसन या लढतीसही मुकणार आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर व फिरकीपटू महीष थिक्षणा राजस्थानचे आधारस्तंभ आहेत. संदीप शर्मा व फझलहक फारुकी यांना मात्र कामगिरी उंचवावी लागणार आहे. तसेच वानिंदू हसरंगाही अपयशी ठरत आहे. एकंदर गोलंदाजांनाही मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यासाठी चांगला खेळ करावा लागणार आहे. या लढतीसाठी राजस्थान विशेष गुलाबी जर्सी परिधान करणार असून याद्वारे ते महिलांचा सन्मान करणार आहे.
बोल्ट, बुमराला रोखण्याचे आव्हान
मुंबईची गोलंदाजी ही त्यांची खरी ताकद आहे. त्यातच गेल्या सामन्यात जसप्रीत बुमराने ४, तर ट्रेंट बोल्टने ३ बळी मिळवून लय मिळवली आहे. दीपक चहरही सुरुवातीच्या षटकांत स्विंग करण्यात पटाईत आहे. अशा स्थितीत मुंबईच्या वेगवान त्रिकुटाविरुद्ध राजस्थानच्या फलंदाजांचा कस लागू शकतो. मिचेल सँटनर या लढतीसाठी उपलब्ध असल्यास मुंबई कॉर्बिन बोशला वगळण्याची शक्यता आहे. फलंदाजीत बुधवारीच वयाची ३८ वर्षे पूर्ण करणारा रोहित शर्मा, सूर्यकुमार व प्रतिभावान तिलक वर्मा यांच्यावर मुंबईची भिस्त आहे. त्याशिवाय रायन रिकल्टन, नमन धीरही उत्तम लयीत आहे. विल जॅक्स गोलंदाजीत कमाल दाखवत असला तरी फलंदाजीत त्याच्याकडून धडाका अपेक्षित आहे. हार्दिकलाही अष्टपैलू कामगिरी करावी लागेल.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३० सामन्यांपैकी मुंबईने १५, तर राजस्थानने १४ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज असल्याचे दिसते. त्यातच गेल्या काही वर्षांत मुंबईला सवाई मानसिंह स्टेडियमवर विजय मिळवता आलेला नाही.
महाराष्ट्र दिनी रोहितकडून रिटर्न गिफ्ट?
भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्माने बुधवारी जयपूर येथे ३८वा वाढदिवस थाटात साजरा केला. आता १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून या दिवशी ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रोहित दमदार खेळी साकारून राज्यातील तमाम मराठी चाहत्यांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. बुधवारी रोहितने पत्नी रितिका आणि संघातील अन्य सहकाऱ्यांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. २०२३मध्ये रोहितच्या वाढदिवशीच झालेल्या राजस्थानविरुद्धच्या लढतीत मुंबईने थरारक विजय मिळवला होता.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप