अहमदाबाद : भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने सोमवारी दणक्यात सोनेरी पुनरागमन केले. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. त्याशिवाय मीराबाईने २०२६च्या ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (कॉमनवेल्थ गेम्स) थेट पात्र ठरण्याचा मान मिळवला.
मणीपूरच्या ३१ वर्षीय मीराबाईने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते, तर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने, तिचे पदक थोडक्यात हुकले. त्यानंतर दुखापतीमुळे मीराबाई खेळापासून दूर होती. तसेच यंदा जून महिन्यात आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने ४९ किलो वजनी गट बंद करून ४८ किलो गट सुरू केला. मात्र मीराबाईच्या कामगिरीवर गट बदलण्याचा फारसा परिणाम जाणवला नाही व तिने अपेक्षेप्रमाणे सुवर्ण कमावले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास वर्षभराने पुनरागमन करताना मीराबाईने स्नॅचमध्ये ८४, तर क्लीन अँड जर्कमध्ये १०९ असे एकूण १९३ किलो वजन उचलून सुवर्ण काबिज केले. २०१९मध्ये मीराबाईने ४८ किलो गटातच या स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.
सोमवारी मीराबाईने सहापैकी तीन प्रयत्नांमध्ये वजन यशस्वीरीत्या उचलले. तिचा स्नॅच प्रकारात पहिला प्रयत्न अपयशी गेला. तिच्या डाव्या हाताचा कोपरा पूर्णपणे सरळ रेषेत नसल्याचे पंचांनी घोषित केले. दुसऱ्या प्रयत्नात मात्र तिने ८४ किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात मीराबाईला ८९ किलो वजन उचलण्यात अपयश आले. यावेळी तिच्या पायाला इजा देखील झाली. मात्र क्लीन अँड जर्कमध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात १०५ किलो वजन उचलून सुवर्णसाठी दावेदारी सादर केली. मग दुसऱ्या प्रयत्नात १०९ किलो उचलून तिने पदक पक्के केले. तिसऱ्या प्रयत्नात मीराबाईला ११३ किलो उचलण्यात अपयश आले. मात्र तिचे सुवर्ण तोपर्यंत पक्के झाले होते.
मलेशियाच्या दुसऱ्या क्रमांकावरील इरेन हेन्रीने १६१ किलो (७३ आणि ८८) वजन उचलले. म्हणजेच मीराबाई व हेन्रीमध्ये तब्बल ३२ किलो वजनाचा फरक होता. यावरूनच मीराबाईचे वर्चस्व दिसून येते. वेल्सच्या निकोल रॉर्बट्सने १५० किलो वजनासह कांस्यपदक जिंकले. २०२६मध्ये आता ग्लास्गो येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार असून त्यासाठी मीराबाई थेट पात्र ठरली आहे. त्यामुळे राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची धडाक्यात सुरुवात झाली असून यामध्ये आणखी पदकांची भर पडण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने मी समाधानी आहे. विशेषत: आता ४९ ऐवजी ४८ किलो वजनी गटात सहभागी झाल्याने मला पुन्हा २०१८ प्रमाणेच छाप पाडायची होती. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेतही देशासाठी पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.मीराबाई चानू
२०२६च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र
वेटलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाद्वारे मीराबाई २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेकरता (कॉमनवेल्थ गेम्स) पात्र ठरली आहे. ग्लास्गो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी मीराबाईसमोर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत पदक पटकावण्याचे आव्हान असेल. नॉर्वे येथे १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत वेटलिफ्टिंगची राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे. मीराबाईने २०१७च्या जागतिक स्पर्धेत ४८ किलो गटातच सुवर्ण जिंकले होते. तर २०२२मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे साहजिकच मीराबाई पुन्हा एकदा पदकाची दावेदार आहे.
पुरुषांमध्ये ऋषिकांताला सुवर्ण
पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात भारताच्या ऋषिकांता सिंगने सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने एकूण २७१ किलो (१२० व १५१) वजन उचलले. भारताचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले. एकंदर गेल्या काही वर्षांत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी केली असून २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.