माजी कर्णधार मिताली राज हिनेही वर्ल्डकप हातात घेऊन जल्लोष केला. यावेळी सध्याची कर्णधार हरमनप्रीत आणि अन्य खेळाडूही उपस्थित होते.  
क्रीडा

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

भारताच्या या ऐतिहासिक विजयाने महिला क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला असून, मिताली राजसारख्या दिग्गजांच्या संघर्षाची आणि प्रेरणेची कहाणी आज पूर्णत्वास गेली आहे.

Krantee V. Kale

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने भावनिक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"जागतिक क्रिकेटच्या नवीन चॅम्पियन्स...भारतीय महिलांनी विश्वचषक उंचवावा, हे स्वप्न मी गेल्या २० वर्षांपासून पाहत होते. आज रात्री अखेर ते स्वप्न साकार झाले", असे मितालीने म्हटले. या पोस्टमध्ये मितालीने भारतीय महिला क्रिकेटच्या दोन दशकांच्या प्रवासातील संघर्ष, अपयश आणि शेवटी मिळालेल्या यशाची आठवण करून दिली आहे. तिने २००५ आणि २०१७ च्या अपयशाचा संदर्भ देत सांगितले की, प्रत्येक त्याग, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक मुलगी जिने बॅट हातात घेतली त्या सर्वांनी मिळून हा क्षण साकार केला आहे. “तुम्ही फक्त विश्वचषक नव्हे, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी धडधडणारे प्रत्येक हृदय जिंकले. जय हिंद" असेही मितालीने अखेरीस म्हटले.

२००५ आणि २०१७ च्या अंतिम सामन्याच्या कटू आठवणी पुसल्या

२००५ मधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाची सपशेल निराशा झाली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१५ धावांचा पाठलाग करताना केवळ ११७ धावांतच टीम इंडिया गारद झाली होती. तर, २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात २२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २१९ धावाच करू शकला होता. विशेष म्हणजे दोन्हीवेळी मिताली राज हिच भारताची कर्णधार होती.  रविवारी (दि.२) रात्री नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारली आणि २००५ व २०१७ च्या अंतिम सामन्यांमधील पराभवाच्या जखमा पुसल्या.  दरम्यान, भारताच्या या ऐतिहासिक विजयाने महिला क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला असून, मिताली राजसारख्या दिग्गजांच्या संघर्षाची आणि प्रेरणेची कहाणी आज पूर्णत्वास गेली आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?

शुद्ध सांडपाण्याचा वापर बंधनकारक होणार; राज्य सरकारचे धोरण जाहीर