मुंबई : दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांनी रविवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. या पदासाठी अखेरची तारीख २१ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत होती. त्या आधी मन्हास यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते या पदासाठी आघाडीचे उमेदवार असल्याची चर्चा आहे.
मन्हास यांनी १९९७-९८ ते २०१६-१७ या त्यांच्या कारकीर्दीतील कालावधीत १५७ प्रथम श्रेणी, १३० लिस्ट ए आणि ५५ आयपीएलचे सामने खेळले आहेत. गेल्या महिन्यात रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी उमेदवारी अर्ज मागण्यात आले आहेत. या पदासाठी मन्हास हे आघाडीचे दावेदार आहेत.
नवी दिल्लीतील एका अनौपचारिक बैठकीनंतर ४५ वर्षीय मन्हास यांचे नाव पुढे आले. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येत्या रविवारी काही महत्त्वाच्या पदांवरही निवड होणार आहे.
नवीन कार्यकारिणी पुढील कार्यकाळासाठी तयार केली जात आहे. मिथुन मन्हास हे माजी खेळाडू असून त्यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे त्यांच्या पदावर कायम राहतील, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.