नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू निखिल चोप्रा, दिल्लीचा अनुभवी खेळाडू मिथुन मन्हास, सध्याचे ज्युनियर संघाचे निवड समिती सदस्य क्रिशन मोहन हे भारतीय क्रिकेट संघासाठी निवड समिती सदस्यासाठी शर्यतीत आहेत.
बीसीसीआयने निवड समितीतील एका जागेसाठी जानेवारी महिन्यात अर्ज मागवले होते. सद्यस्थितीत निवड समितीमध्ये अध्यक्ष अजित आगरकर आणि सलिल अंकोला हे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे अंकोला यांच्या जागी आता उत्तर विभागाला संधी मिळणार आहे. सध्या चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर उत्तर विभागाचा प्रतिनिधी नाही.
पंजाबचे माजी क्रिकेटपटू मोहन हे ज्युनियर निवड समितीवर सप्टेंबर २०२१ पासून असून त्यांनीही भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समिती सदस्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा यानेही या रिंगणात उडी घेतली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवाराची निवड करणार आहे. मिथुन मन्हास याने १५७ प्रथम श्रेणी सामन्यांत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तो आयपीएलमध्ये २०१० ते २०१४ साली खेळला होता. निखिल चोप्रा भारताकडून एक कसोटी आणि ३९ वनडे सामने खेळला असून सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे.