कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बंगालच्या ५० संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी देशांतर्गत स्पर्धेतून तो पुनरागमनाच्या तयारीत असल्याचे समजते.
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र हा दिग्गज खेळाडू आता देशांतर्गत स्पर्धेतून पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या या यादीत वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि वरच्या फळीतील फलंदाज अभिमन्यू इश्वरन यांचाही समावेश करण्यात आला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, अनुभवी फलंदाज अनुस्तुप मुजुमदार यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मुजुमदारकडे पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
दुखापतीतून सावरत असलेला अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद, यष्टीरक्षक फलंदाज -अभिषेक पोरेल या खेळाडूंनाही यादीत स्थान देण्यात आले आहे. शमी आगामी हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीतून करू शकतो. ही स्पर्धा यंदा २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
३३ वर्षीय शमीने भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी२० सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळला होता. या स्पर्धेत त्याने पाच सामन्यांत ९ बळी घेतले होते.