वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्याच्या निर्णयावर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सिराजचा अनुभव, आक्रमकता आणि सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता त्याला संघात स्थान मिळायला हवे होते, असे दोघांचे मत आहे. भारताने या सामन्यासाठी चार वेगवान गोलंदाजांची निवड केली. जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली प्रसिध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांना संधी देण्यात आली. मात्र, इंग्लंडमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या सिराजला बाहेर ठेवल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.
“भारत या सामन्यात जोरदार पुनरागमन करेल, अशी आशा आहे. मात्र, वेग, कौशल्य आणि चेंडूची सीम मूव्हमेंट हे निकष असतील आणि ताशी १४० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज मिळणे कठीण असेल, तर एक प्रश्न विचारावाच लागेल. मोहम्मद सिराज कुठे आहे? त्याचा अनुभव, आक्रमकता आणि चेंडूने सामन्यात निर्णायक बदल घडवून आणण्याची क्षमता यांना निश्चितच महत्त्व आहे,” असे शास्त्री यांनी ट्वीट केले.
माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही सिराजला अंतिम अकरामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. “सिराजला संघात स्थान न मिळणे आश्चर्यकारक आहे. मात्र, अलीकडील घडामोडी पाहता असे काही होऊ शकते, याचे संकेत मिळत होते. त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आणि त्यानंतर केवळ अखेरच्या सामन्यात खेळवण्यात आले. त्या सामन्यात त्याला संधी दिली तेव्हा पहिल्या कसोटीसाठी त्याची तयारी करून घेतली जात आहे, असे मला वाटले होते. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याचे नाव नसणे आश्चर्यकारक आहे,” असे गावस्कर यांनी सांगितले. सिराजने भारताला कधीही निराश केलेले नाही. त्याच्या गोलंदाजीत काही चुकीचे घडले आहे, असेही दिसत नाही, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले. एकूणच सिराजला वगळण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे.
ओव्हलवरील कामगिरीची आठवण
सिराजने गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ओव्हल कसोटीत संस्मरणीय कामगिरी केली होती. पाचव्या दिवशी त्याने जिद्दीने गोलंदाजी करत भारताला मालिका बरोबरीत आणून देणारा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला वगळण्याचा निर्णय अधिक चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी बुमराने तीन विकेट घेतल्या; मात्र अन्य वेगवान गोलंदाजांना अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे सिराजच्या अनुपस्थितीवरून संघ व्यवस्थापनाच्या निवडीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. एकदिवसीय मालिकेत सिराजला फक्त एकच लढत खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतही तो लयीत होता. मात्र अचानक त्याला वगळल्याने प्रशिक्षक गौतम गंभीरसह कर्णधार गिलवर टीका करण्यात येत आहे.