भारताचा श्रीलंका दौरा : सिराजचा पराक्रम; भारताचा रोमहर्षक विजय 
क्रीडा

भारताचा श्रीलंका दौरा : सिराजचा पराक्रम; भारताचा रोमहर्षक विजय

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी सलग तीन षटकार लगावण्याचा पराक्रम केला. त्याने १५ चेंडूंतच नाबाद ३२ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी खेळवण्यात आलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने श्रीलंका एकादश संघाचा ६ गडी राखून पराभव केला.

Swapnil S

कोलंबो : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी सलग तीन षटकार लगावण्याचा पराक्रम केला. त्याने १५ चेंडूंतच नाबाद ३२ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी खेळवण्यात आलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने श्रीलंका एकादश संघाचा ६ गडी राखून पराभव केला. २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ४५ षटकांत ४ बाद २१४ धावा करत विजय मिळवला.

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात ६१ धावांची जलद खेळी केली. त्याला शुभमन गिलने ४४ धावा करत चांगली साथ दिली, तर दोघांनी पहिल्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी रचून भारताला मजबूत सुरुवात करून दिली. बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन दिवसांत खेळू न शकलेला कर्णधार गिल मैदानात परतणे ही भारतासाठी जमेची बाजू ठरली. इतर फलंदाजांमध्ये ध्रुव जुरेलने १७ आणि ऋषभ पंतने २८ धावांचे योगदान दिले.

त्याआधी, श्रीलंका संघाने आपला दुसरा डाव ६ बाद २०० धावांवर घोषित करत भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान संघाकडून निशन मदुष्काने सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर निपुण धनंजयने ४६ आणि अंजाला बंदाराने ३५ धावांचे योगदान दिले. भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जडेजा आणि गुर्नूर ब्रार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या ३६३ धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पहिला डाव ६ बाद ३५७ धावांवर घोषित केला होता. भारताकडून देवदत्त पडिक्कलने नाबाद १४२ धावांची शतकी खेळी केली होती, तर जडेजाने ६३, मानव सुथारने ४१ आणि गुरनूर ब्रारने नाबाद ३६ धावा केल्या होत्या. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी या सराव सामन्यामुळे भारतीय संघाला चांगला सराव मिळाला आहे. आता कसोटी मालिकेकडे लक्ष असेल.

सर्फराझचा समावेश

श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी मुंबईच्या सर्फराझ खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने रविवारी ही घोषणा केली. डावखुरा फलंदाज सुदर्शनला गेल्या महिन्यात भारत-अ संघाच्या दौऱ्यादरम्यान पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सध्या तो बंगळुरू येथील 'बीसीसीआय'च्या सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. सर्फराझ २०२४मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

२०१५ पूर्वीच्या एकतर्फी मध्यस्थांच्या नेमणुका आपोआप रद्द ठरत नाहीत - मुंबई उच्च न्यायालय

पदवीदान समारंभात सरन्यायाधीशांच्या उपस्थितीवर नाराजी; लॉ विद्यापीठाच्या ४५० विद्यार्थ्यांचा CJI सूर्य कांत यांना विरोध