चेन्नई: आयपीएलच्या १९वा हंगामातील पहिला सामना खेळण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघासह त्यांच्या तमाम चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार व अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे किमान दोन आठवडे विश्रांतीवर असणार आहे. त्यामुळे धोनी ४ ते ५ लढतींना मुकणार असल्याचे समजते.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसणार आहेत.
आयपीएलचा १९वा हंगाम शनिवारपासून सुरू झाला. पाच वेळचा विजेता चेन्नईचा संघ सोमवारी राजस्थानविरुद्ध त्यांचा पहिली लढत खेळणार आहे. ४४ वर्षीय धोनीचा हा आयपीएलचा अखेरचा हंगाम ठरण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फलंदाजी दरम्यान धावतानाही संघर्ष करावा लागत असल्याचे गतवर्षी दिसून आले.
यंदा सरावात धोनीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चेन्नईने द्विटवर याविषयी अधिकृत घोषणा केली.
धोनीच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन यष्टिरक्षण करणार आहे. नुकताच झालेल्या टी-२० विश्वचषकात सॅमसनने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला. यंदा लिलावापूर्वी चेन्नईने सॅमसनला ट्रेड राजस्थानकडून (अदलाबदल) केले. त्याबदल्यात रवींद्र जडेजा व सॅम करन हे खेळाडू राजस्थानमध्ये दाखल झाले. तेव्हाच सॅमसन चेन्नईचा यष्टिरक्षक असेल व भविष्यात कर्णधारही होईल, याची कल्पना चाहत्यांना आली होती. आता धोनीच्या अनुपस्थितीत सॅमसन सलामीला यष्टिरक्षणासह फलंदाजीसही येणार असल्याचे समजते.
चेन्नईकने उर्मिल पटेलच्या यष्टिरक्षणाचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र तूर्तास सॅमसनलाच प्राधान्य दिले जाईल. धोनी थेट १४ एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध किंवा १८ एप्रिल रोजी हैदराबादविरुद्धच्या लढतीसाठी तंदुरुस्त होऊन संघात परतेल, अशी शक्यता आहे.
चेन्नईला गेली दोन वर्षे बाद फेरी गाठता आलेली नाही. तसेच स्पर्धेच्या इतिहासात आजवर प्रथमच धोनी तब्बल दोन आठवडे नसेल. अशा स्थितीत युवा खेळाडू चेन्नईला कसे सावरणार, हे पाहणे रंजक ठरेल. ऋतुराजच्या मराठमोळ्या नेतृत्वाचादेखील धोनीच्या अनुपस्थितीत कस लागणार, हे निश्चित.
सॅमसन सलामीला
चेन्नईकडून यंदा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह यष्टिरक्षक सॅमसन सलामीला येणार आहे. स्वतः ऋतुराजनेच याविषयी माहिती दिली. गतवर्षी मुंबईकर आयुष म्हात्रे सलामीला येत होता. मात्र यंदा सॅमसनला चेन्नई संघाने प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. आयुष तिसऱ्या स्थानी खेळेल, असे समजते.