कोलकाता : मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने (५२ धावांत ७ बळी) पुन्हा एकदा केलेल्या भेदक माऱ्यापुढे बंगालची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चौथ्या विजयाची नोंद करताना बंगालचा १ डाव आणि ४ धावांच्या फरकाने फडशा पाडला.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या अ-गटातील या लढतीत विजय मिळवून मुंबईने अग्रस्थान भक्कम केले आहे. शिवम दुबेच्या कर्णधापदाखाली खेळणाऱ्या मुंबईचे सध्या ५ सामन्यांतील ४ विजयांसह २७ गुण आहेत. आंध्र प्रदेश या गटात १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईने फक्त गेल्या लढतीत उत्तर प्रदेशकडून पराभव पत्करला. त्यापूर्वी तीन सामन्यांत मुंबईने बिहार, आंध्र प्रदेश, केरळला धूळ चारली होती. आता ९ फेब्रुवारीपासून मुंबईची छत्तीसगडशी गाठ पडेल.
मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा केल्यानंतर बंगालचा पहिला डाव शनिवारी १९९ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईने त्यांच्यावर फॉलो-ऑन लादला. मात्र मोहितसमोर बंगालचा दुसरा डाव ५९.४ षटकांत २०९ धावांत संपुष्टात आला. अभिषेक पोरेलने ८२ धावांची एकाकी झुंज दिली. कर्णधार मनोज तिवारी (२६) व पहिल्या डावातील शतकवीर अनुस्तुप मजुमदारने (१४) निराशा केली. मुंबईच्या मोहितने तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याने पहिल्या डावात ३ व संपूर्ण लढतीत एकूण १० गडी बाद केले.
महाराष्ट्राचा सौराष्ट्रकडूनही मानहानीकारक पराभूत
केदार जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राला अ-गटातील लढतीत सौराष्ट्रने ४८ धावांनी नमवले. २१३ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांतच आटोपला. डावखुरा फिरकीपटू पार्थ भूतने ७ बळी मिळवले. अंकित बावणे (२५), केदार (१८), कौशल तांबे (१६) हे अपयशी ठरले. महाराष्ट्राचा हा पाच सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. ११ गुणांसह महाराष्ट्र गटात सहाव्या स्थानी असून त्यांचा पुढील सामना विदर्भाशी होईल.
विदर्भाचा आघाडीसाठी संघर्ष
राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या अ-गटातील लढतीत विदर्भाचे लक्ष्य पहिल्या डावात आघाडी मिळवण्याचे आहे. राजस्थानने ४३२ धावा केल्यावर विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद १९० धावा केल्या आहेत. ते अजून २४२ धावांनी पिछाडीवर असून करुण नायर ४०, तर मोहित काळे १८ धावांवर खेळत आहे. या सामन्यातील बहुतांश खेळ पाऊस व अंधूक सूर्यप्रकाशामुळे वाया गेला. विदर्भ या गटात ४ सामन्यांतील ३ विजयांसह अग्रस्थानी आहे.
मोहितने यंदाच्या रणजी हंगामातील पाच सामन्यांत तब्बल २८ बळी मिळवले आहेत. तसेच मुंबईच्या चार विजयांपैकी तीनदा मोहितच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
मोहित अवस्थी
१६-४-५२-७
विल्यम्सनचे ३०वे, रवींद्रचे पहिले शतक
वेलिंग्टन : केन विल्यम्सनने (२५९ चेंडूंत नाबाद ११२ धावा) साकारलेल्या ३०व्या कसोटी शतकाला युवा रचीन रवींद्रच्या (२११ चेंडूंत नाबाद ११८) पहिल्या शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर ८६ षटकांत २ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली. टॉम लॅथम (२०), डेवॉन कॉन्वे (१) स्वस्तात बाद झाल्यावर विल्यम्सन व रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी रचली आहे.
ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी
सिडनी : सीन ॲबटने (६९ धावा आणि ३ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला ८३ धावांनी नामोहरम केले. प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी ९ बाद २५८ धावा केल्या. मग जोश हेझलवूड व ॲबटपुढे विंडीजचा संघ ४३.३ षटकांत १७५ धावांत गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
झादरानच्या शतकाद्वारे अफगाणिस्तानचे प्रत्युत्तर
कोलंबो : सलामीवीर इब्राहिम झादरानने (२१७ चेंडूंत नाबाद १०१ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव कसोटीत दमदार पुनरागमन केले. अफगाणिस्तानने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद १९९ धावा केल्या असून इब्राहिमच्या साथीला रहमत शाह ४६ धावांवर खेळत आहे. अफगाणिस्तानचा संघ अद्याप ४२ धावांनी पिछाडीवर आहे. अफगाणिस्तानला पहिल्या दिवशी १९८मध्ये गुंडाळल्यावर श्रीलंकेने पहिल्या डावात ४३९ धावा केल्या आहेत.