मुंबई : मुंबई हे माझे शहर आहे. या शहरातील मॅरेथॉनमध्ये अग्रस्थान मिळवून दाखवायचेच, अशी प्रतिक्रिया यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय विभागात अग्रस्थानाचे पारितोषिक पटकावणाऱ्या कार्तिक करकेराने व्यक्त केली.
२८ वर्षीय कार्तिक हा मूळचा बोरिवलीचा. तेसुद्धा तो स्वत: डॉक्टर आहे. मॅरेथॉनमध्ये धावत नसता, तर तो धावपटूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष देत असता किंवा रुग्णालयात एखादी शस्त्रक्रिया करण्यात मग्न असता. मात्र नशीबात जे लिहिले असते, ते मिळतेच. सरावासाठी तसेच वैद्यकीय नोकरीसाठी नाशिकला स्थलांतरित झालेला कार्तिक तेथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मात्र मुंबई मॅरेथॉनसाठी महिन्याभराची सुट्टी घेत त्याने रविवारी प्रथमच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला व अग्रस्थान पटकावून दाखवले. यापूर्वी कार्तिक अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचा. त्याचे कुटुंब अद्याप बोरिवलीतच राहत आहे.
प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनात नाशिक येथेच सराव करून कार्तिकने हे यश साध्य केले. भारतीय महिला विभागात पहिले स्थान मिळवणारी अनुभवी संजीवनी व गतविजेती निर्माबेन यादेखील विजेंदर यांच्याच मार्गदर्शनात सराव करतात. कार्तिकने गतवर्षी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. आता त्याने पुन्हा एकदा या स्पर्धेत छाप पाडण्याचे लक्ष समोर ठेवले आहे.
“ही माझी मुंबईतील पहिली मॅरेथॉन होती आणि पदार्पणात जिंकणे खूप छान वाटते. मला आव्हानात्मक मार्गातून पुढे जावे लागले, परंतु मुंबईत येऊन या विशेष शर्यतीत सहभागी होणे मला आवडले. माझे पुढील ध्येय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे आहे,” असे कार्तिक म्हणाला. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना त्याचा नम्रपणा जाणवत होता. यावेळी कार्तिकचे प्रशिक्षक व वडील जयराजदेखील उपस्थित होते.
“कोस्टल रोडवरून धावणे सुरुवातीला आव्हानात्मक वाटत होते. मात्र सर्वांसाठी सारखेच नियम असल्याने मी या आव्हानास सकारात्मकतेने सामोरा गेलो. मुंबईतील वातावरण व एक्यूआय आज उत्तम होते. याचाही लाभ झाला. ३५ किमी अंतर पार केल्यावर आपण अग्रस्थान मिळवू, याची खात्री होती,” असेही कार्तिकने मान्य केले.
पहिल्याच प्रयत्नात संजीवनी यशस्वी
आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या संजीवनीने यंदा प्रथमच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होत विजेतेपद पटकावले. तिने दोन वेळच्या विजेत्या निर्माबेनवर सरशी साधली. निर्मा व संजीवनी दोघेही नाशिकमध्ये एकत्रित सराव करतात. त्यामुळे दोघींमधील झुंज पाहण्यासारखी होती. “मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिले स्थान पटकावण्याचे स्वप्न पूर्ण झाले. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. माझे प्रशिक्षक, कुटुंब या सर्वांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. आता आशियाई स्पर्धेचे पात्रतेचे माझे लक्ष्य आहे,” असे संजीवनी म्हणाली. २९ वर्षीय संजीवनीला राज्य क्रीडा शासनाकडून श्री शिवछत्रपती पुरस्कार देऊनही २०१८मध्येच गौरवण्यात आले आहे.