मुंबई : शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने अपेक्षेप्रमाणे पुद्दुचेरीचा एक डाव आणि २२२ धावांच्या फरकाने धुव्वा उडवला. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय बोनस गुणासह मिळवला. याबरोबरच मुंबईने ड-गटातील अग्रस्थान भक्कम केले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ५ बाद ६३० धावांवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाड (१७०) व आकाश आनंद (१०७) यांनी शतके झळकावली. त्यानंतर पुद्दुचेरीचा पहिला डाव १३२ धावांत गुंडाळल्यावर मुंबईने त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता. अखेरीस बुधवारी चौथ्या दिवशी मुंबईला विजयासाठी फक्त चार बळींची आवश्यकता होती.
मंगळवारच्या ६ बाद २३१ धावांवरून पुढे खेळताना पुद्दुचेरीचा दुसरा डाव ५३.३ षटकांत २७६ धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने ३, तर शार्दूल व शम्स मुलानीने प्रत्येकी २ बळी मिळवले. अमन खान (८६) व सिद्धांत अधटराव (५४) यांनी अर्धशतकी झुंज दिली. मात्र ते पराभव टाळू शकले नाहीत. परिणामी मुंबईने विजय नोंदवला. सिद्धेशला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबईचा संघ सध्या ड-गटात २४ गुणांसह अग्रस्थानी आहे. मुंबईने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. मुंबईची आता रणजी स्पर्धेतील पुढील लढत थेट हैदराबादविरुद्ध २२ जानेवारी रोजी रंगणार आहे. कारण आता रणजीचा पहिला टप्पा संपला असून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
मुंबईने सलामीच्या लढतीत जम्मू आणि काश्मीरला नमवले. मग छत्तीसगडविरुद्ध त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवले, तर राजस्थानविरुद्ध अनिर्णित लढतीत त्यांना एकाच गुणावर समाधान मानावे लागले. चौथ्या लढतीत मुंबईने हिमाचल प्रदेशला डावाने धूळ चारून गटात अग्रस्थान पटकावले. आता पाचव्या सामन्यातील विजयासह मुंबईचे अग्रस्थान आणखी भक्कम झाले आहे.
दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९१व्या हंगामाला प्रारंभ झाला. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात होईल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा संपन्न होईल. या स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.
गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे कडवे आव्हान असेल. मुंबईने २०२४मध्ये रहाणेच्या नेतृत्वात स्पर्धा जिंकली होती. २०२५मध्ये मात्र मुंबईला उपांत्य फेरीत विदर्भाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता २०२६च्या हंगामात मुंबईकडून पुन्हा जेतेपद अपेक्षित आहे.
आता मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत शार्दूलच मुंबईचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. शार्दूलवर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावापूर्वीच बोली लावून संघात घेतले आहे. त्यामुळे तो टी-२० प्रकारात कसा खेळतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.