क्रीडा

मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : वैभवच्या विक्रमी शतकावर पृथ्वीची अर्धशतकी खेळी भारी; हार्दिक पंड्याचेही धडाक्यात पुनरागमन

मुश्ताक अली स्पर्धेच्या ब-गटात बिहारच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ६१ चेंडूंत नाबाद १०८ धावा फटकावतानाच विक्रमी शतक साकारले. मात्र कर्णधार पृथ्वी शॉने ३० चेंडूंत ६६ धावा तडकावल्यामुळे महाराष्ट्राने बिहारला ३ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले.

Swapnil S

कोलकाता : मुश्ताक अली स्पर्धेच्या ब-गटात बिहारच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ६१ चेंडूंत नाबाद १०८ धावा फटकावतानाच विक्रमी शतक साकारले. मात्र कर्णधार पृथ्वी शॉने ३० चेंडूंत ६६ धावा तडकावल्यामुळे महाराष्ट्राने बिहारला ३ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना वैभवने ७ चौकार-षटकारांसह शतक साकारल्याने बिहारने २० षटकांत ३ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. वैभव हा मुश्ताक अली स्पर्धेत शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याचे सध्याचे वय १४ वर्षे २५० दिवस आहे. मात्र वैभवच्या शतकाव्यतिरिक्त अन्य फलंदाज फारशी छाप पाडू शकले नाहीत.

मग लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीने ११ चौकार व १ षटकारासह ६६ धावा केल्या. त्याला निरज जोशी (३०) व निखिल नाईक (२२) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे महाराष्ट्राने १९.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. महाराष्ट्राचा हा चार सामन्यांत दुसरा विजय ठरला. सध्या ते गटात पाचव्या स्थानी असून त्यांची पुढील लढत मध्य प्रदेशविरुद्ध होईल.

हार्दिक पंड्याचे धडाक्यात पुनरागमन

भारताचा तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याने मंगळवारी अडीच महिन्यांनी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. हार्दिकने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा फटकावल्याने बडोदाने पंजाबला क-गटात ७ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले. पंजाबचे २२३ धावांचे लक्ष्य बडोद्याने अवघ्या तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

३२ वर्षीय हार्दिक हा सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत जायबंदी झाला होता. स्नायूंच्या दुखापतीमुळे तो जवळपास अडीच महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र बंगळुरू येथे बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केली. त्यामुळे वैद्यकीय चमूने त्याला मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा