Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील लोकलमध्ये एका प्रवाशाला दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, चौकशीदरम्यान त्यांनी माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात
Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात
Published on

मुंबई : मुंबई लोकलमधील मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चर्चगेट-बांद्रा स्लो लोकलमध्ये एका प्रवाशाकडे पैशांची मागणी करून, नकार मिळाल्यानंतर दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान दोघांनी आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पैशांवरून वाद, त्यानंतर मारहाण

मुंबई सेंट्रल जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जुलै रोजी रात्री ११ ते ११.१० वाजण्याच्या सुमारास चर्चगेट-बांद्रा स्लो लोकलमध्ये माहिम आणि वांद्रे स्थानकादरम्यान घडली.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही ट्रान्सजेंडर व्यक्तींनी एका प्रवाशाकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन संबंधित प्रवाशाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अद्याप जखमी प्रवाशाची ओळख जाहीर केलेली नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली. व्हिडिओमध्ये दोन ट्रान्सजेंडर व्यक्ती प्रवाशाला हाताने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी डब्यातील कोणत्याही प्रवाशाने हस्तक्षेप केला नाही. मात्र, एका प्रवाशाने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली.

दोन ट्रान्सजेंडर ताब्यात

तपासादरम्यान दादर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) व्हिडिओतील दोन्ही ट्रान्सजेंडर व्यक्तींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबई सेंट्रल जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्यांची ओळख कृष्णा चंद्र भास्कर दास उर्फ शुभांगी गुरु संध्या (वय २१, रा. नालासोपारा पूर्व) आणि रुपम राजकुमार खटीक उर्फ रुपाली गुरु सना शेख (वय १६, रा. माहिम पश्चिम) अशी केली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 115(2) अंतर्गत दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीदरम्यान दोघांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात
Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

पुढील तपास सुरू

रेल्वे पोलिसांकडून सध्या संबंधित प्रवाशाचा जबाब नोंदविण्याचे तसेच प्रत्यक्षदर्शी प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात असून, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in