क्रीडा

यंदा जळगावात रंगणार राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा; २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ११ वर्षांखालील जवळपास ५०० मुला-मुलींचा समावेश

यंदा जळगाव येथे ३८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. ११ वर्षांखालील वयोगटाची ही स्पर्धा जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश मैदानात खेळवण्यात येईल.

Swapnil S

जळगाव : यंदा जळगाव येथे ३८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. ११ वर्षांखालील वयोगटाची ही स्पर्धा जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश मैदानात खेळवण्यात येईल.

बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत आहे. या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळाला असून देशभरातून ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, यामध्ये फिडे मानांकनप्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेत एकूण ११ फेऱ्या होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशिष बरूवा हे मुख्य पंचांची भूमिका निभवतील, तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून कार्यरत असतील. तसेच गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य १४ पंच हे या स्पर्धेचे संचलन करतील. ही बुद्धिबळ स्पर्धा मुली व मुले अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक डावासाठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी ९० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे.

बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे. सदरील स्पर्धा जरी ११ वर्षांखालील मानांकन स्पर्धा असली तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात. अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता नवोदित खेळाडूंना देखील मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळते. मुलांच्या गटात पुण्याचा अद्विक अगरवाल, तर मुलींमध्ये केरळच्या देवी बिजेसला अग्रमानांकन लाभले आहे.

सदर राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख यांनीही सहकार्य केले आहे.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील. तसेच चेसबेसद्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या वेबसाइटवर पाहता येतील. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’