क्रीडा

Asia Cup Cricket Tournament: शफालीपुढे नेपाळची शरणागती! भारतीय महिलांचा सलग तिसरा विजय; हेमलता, दीप्ती यांचीही चमक

२० वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने अवघ्या ४८ चेंडूंत ८१ धावांची तुफानी खेळी साकारली.

Swapnil S

दाम्बुला : २० वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने अवघ्या ४८ चेंडूंत ८१ धावांची तुफानी खेळी साकारली. तिला दयालन हेमलता (४२ चेंडूंत ४७) आणि फिरकीपटू दीप्ती शर्मा (१३ धावांत ३ बळी) यांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने मंगळवारी महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा ८२ धावांनी धुव्वा उडवला. भारताने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत ९ बाद ९६ धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने या लढतीपूर्वीच अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. आता २६ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारतापुढे ब-गटातील दुसऱ्या क्रमांकाचे आ‌व्हान असेल. भारताने गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि त्यानंतर नेपाळला धूळ चारली. अ-गटातून पाकिस्तानने ४ गुण मिळवत दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. ब-गटात सध्या श्रीलंका अग्रस्थानी असून थायलंड, बांगलादेशमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने या सामन्यासाठी कर्णधार हरमनप्रीत तसेच वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार यांना विश्रांती दिली. त्यामुळे स्मृती मानधनाने भारताचे नेतृत्व केले. मात्र शफालीच्या साथीने हेमलताला सलामीसाठी पाठवण्यात आले. या दोघींनी मिळालेल्या संधीचा लाभ उचलताना नेपाळच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

शफालीने १२ चौकार व १ षटकारासह टी-२० कारकीर्दीतील १०वे अर्धशतक साकारले. तिची ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. तर हेमलताने ५ चौकार व १ षटकारासह ४७ धावा केल्या. या दोघींनी ८४ चेंडूंत १२२ धावांची सलामी नोंदवली. या दोघी लागोपाठच्या षटकात बाद झाल्यावर सजीवन सजना (१०) छाप पाडू शकली नाही. मात्र जेमिमा रॉड्रिग्जने १५ चेंडूंत नाबाद २८, तर रिचा घोषने ३ चेंडूंतच नाबाद ६ धावा फटकावून भारताला २० षटकांत ३ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने पहिल्या पाच षटकांतच सलामीवीरांना माघारी पाठवले. मग मधल्या फळीत दीप्तीने कमाल करताना तीन गडी टिपले. तिला राधा यादवनेसुद्धा २ बळी मिळवून चांगली साथ दिली. सिता राणाने त्यांच्याकडून सर्वाधिक १८ धावा केल्या. अखेर नेपाळला ९ बाद ९६ धावांत रोखून भारताने विजयी हॅट्‌ट्रिक नोंदवली.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : २० षटकांत ३ बाद १७८ (शफाली वर्मा ८१, दयालन हेमलता ४७; सिता राणा २/२५) विजयी वि.

  • नेपाळ : २० षटकांत ९ बाद ९६ (सीता राणा १८, बिंदू रावल नाबाद १७; दीप्ती शर्मा ३/१३)

  • सामनावीर : शफाली वर्मा

  • शफाली वर्मा- ४८ चेंडू

    १२ चौकार

    १ षटकार

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी