क्रीडा

एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे झाले असून कायमस्वरुपी बंद करा - वसिम अक्रम

इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सने सोमवारी एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केली

वृत्तसंस्था

एकदिवसीय क्रिकेट आता कंटाळवाणे झाले असून ते कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, अशी खळबळजनक प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केली आहे.

इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सने सोमवारी एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेसुद्धा काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे झाल्याचे विधान केले होते. त्यामुळे एकदिवसीय प्रकारावर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. “एकदिवसीय क्रिकेट आता बंद केले पाहिजे. इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांनाच चाहते प्रामुख्याने हजेरी लावतात. परंतु भारतासह, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांसाठी स्टेडियम पूर्णपणे भरणे कठीण आहे. कारण एकदिवसीय प्रकारात आता सुरुवातीच्या १० षटकानंतर प्रत्येक संघाची रणनिती स्पष्ट होते. ११ ते ४० षटकांत एकेरी-दुहेरी धावांवर भर देण्यासह षटकात एखादा चौकार ते शोधत असतात. ४० षटकांपर्यंत २०० धावा केल्यावर मग अखेरच्या १० षटकांत फलंदाज आक्रमक रूप धारण करतात. यामुळे काहीही कल्पनेपलीकडील क्रिकेटमध्ये एकदिवसीय प्रकारात उरलेले नाही,” असे ५६ वर्षीय अक्रम एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान म्हणाला.

“स्टोक्सच्या निवृत्तीचा मला आदर असून सध्याच्या काळात तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळणे कठीणच आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांना थरार अनुभवायला मिळतो. सध्या याच सामन्यांचे प्रमाण वाढले आहे. तर कसोटी हा क्रिकेटचा गाभा असल्याने त्याला धक्का बसणे अशक्य आहे. परंतु एकदिवसीय प्रकार नक्कीच त्याची गंमत गमावून बसला आहे,” असेही अक्रमने ठामपणे सांगितले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार