क्रीडा

ऑलिम्पिक पात्रतेसाठी आज विजय अनिवार्य!भारतीय महिला संघाची अखेरच्या साखळी सामन्यात इटलीशी गाठ

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून ०-१ असा पराभव पत्करला.

Swapnil S

रांची : सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकचे स्थान मिळवण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मंगळवारी इटलीला नमवणे गरजेचे आहे. एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारतीय संघ ब-गटात तिसऱ्या स्थानी आहे. गटातून दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने भारताला ही लढत जिंकण्यासह न्यूझीलंडने अमेरिकेकडून पराभव पत्करावा, यासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे.

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून ०-१ असा पराभव पत्करला. मग न्यूझीलंडला ३-१ असे नमवून त्यांनी आव्हान कायम राखले. मात्र २ सामन्यांतील ३ गुणांसह ते सध्या तालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. तर सरल गोलफरकामुळे न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने दोन्ही लढती जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे, तर इटली मात्र दोन पराभवांसह चौथ्या स्थानी आहे.

भारतासाठी उदिता दुहान, संगीता कुमारी यांना चांगली कामगिरी केलेली असून सवितासुद्धा उत्तम गोलरक्षण करत आहे. मात्र भारताने दोन सामन्यांत मिळून तब्बल १२ वेळा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना यावेळी सर्वस्व अर्पण करावे लागेल. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिकचा थरार रंगणार आहे.

प्रशिक्षिका जॅनेक शॉपमन यांनी सोमवारी सर्व खेळाडूंकडून कसून सराव करून घेतानाच गोलरक्षकांना विशेष मार्गदर्शन केले. आता याचा खेळाडूंवर कितपत परिणाम झाला आहे, हे मंगळवारी लढतीतच समजू शकेल. भारतीय संघाच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड व अमेरिका लढत संपलेली असेल. त्यामुळे भारतीय संघासमोर किती गोलच्या फरकाने जिंकायचे, याचे समीकरणही डोळ्यांसमोर असेल. त्यामु‌ळे भारतीय संघ हे आव्हान पार करण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

पेनल्टी कॉर्नरवर गोल न करणे आम्हाला महागात पडू शकते. अमेरिकेविरुद्ध केलेल्या चुकांची पुनरावृत्ती आम्ही न्यूझीलंडविरुद्ध टाळली. मात्र इटलीचा संघ याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे त्यांना कमी लेखणार नाही.

- जॅनेक शॉपमन, भारताच्या प्रशिक्षिका

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी