नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाल्याच्या विरोधात गुरुवारी साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता बजरंगनेही विरोध दर्शवताना पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कुस्तीची राजकीय दंगल सुरूच आहे.
कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण यांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तारांकित कुस्तीपटूंनी लगावला होता. यासंबंधी त्यांनी एप्रिल-मे महिन्यात जंतर मंतर येथे आंदोलनही केले. बजरंग, साक्षी, विनेश फोगट, सत्यवर्त कडियान यांचा त्या आंदोलनात समावेश होता. कुस्तीपटूंना यामध्ये पोलिसांकडून लाठीचार्जही सहन करावा लागला. प्रदीर्घ काळ हा संघर्ष झाल्यानंतर बृजभूषण यांच्या नातेवाईक अथवा कुटुंबीयांपैकी कुणालाही महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, संजय सिंह हे बृजभूषण यांचे नातेवाईक नसले, तरी निकटवर्तीय होते. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी कुस्तीपटू व प्रतिस्पर्धी अनिता शेरॉन यांना नमवले. यासंबंधी शुक्रवारी बजरंगने ट्विटरवर मोदी यांना लिहिलेले पत्र पोस्ट केले. तसेच हे पत्र घेऊन पंतप्रधानांना देण्यासाठी निघाला असताना पोलिसांनी बजरंगला अडवले. त्यानंतर आपले पदक आणि पंतप्रधानांना लिहिलेले पत्र कर्तव्यपथावर ठेवत बजरंग तेथून निघून गेला.
“मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. यासंबंधी हे माझे पत्र आहे. देशातील महिला कुस्तीपटूंचे भवितव्य असुरक्षित असून माझ्या महिला भगिनी कुस्तीतून निवृत्त होताना मी पाहू शकत नाही. मला पद्मश्री, खेलरत्न, अर्जुन यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आल्याने एकेकाळी फार अभिमान वाटायचा. मात्र आता कोणी या पुरस्कारांनी मला ओळखले, तर नक्कीच वाईट वाटेल,” असे बजरंग म्हणाला. बजरंगला २०१९मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
“जानेवारीमध्ये महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा आंदोलन करण्यात आले. मीसुद्धा या आंदोलनाचा भाग झालो. यावेळी केंद्र सरकारने आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबवण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही बृजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. तसेच त्यांचे निकटवर्तीय महासंघाच्या अध्यक्षपदी आल्याने असंख्य खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येणार आहे,” असेही बजरंगने पत्रात नमूद केले.
शासनाचे पैसे व नोकरीही परत करा!
२०२१मध्ये केंद्र सरकारने बजरंगला २.५ कोटी तसेच शासकीय नोकरी दिली. बजरंगने तेसुद्धा परत करावे, अशी प्रतिक्रिया महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. बजरंग व विनेश यांनी स्वत:च्या फायद्यासाठी सगळे काही घडवून आणले आहे. यामुळे असंख्य युवा कुस्तीपटूंचे नुकसान झाले. महासंघाची निवडणूक झाल्याने लवकरच राष्ट्रीय स्पर्धा होतील व कुस्तीला पुन्हा सुरळीत प्रारंभ होईल, अशी अपेक्षा असल्याचे रोहतकमधील एका विख्यात प्रशिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.