क्रीडा

पाकिस्तानने भारताविरुद्ध क्रिकेट खेळणे बंद करावे! माजी क्रिकेटपटूंचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून मागे न हटण्याचा पीसीबीला सल्ला

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात नसेल येणार, तर पाकिस्तानने त्यांच्याविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत क्रिकेट खेळणे बंद करावे. तसेच स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मागे हटू नये, असा सल्ला रशिद लतिफसह पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात नसेल येणार, तर पाकिस्तानने त्यांच्याविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत क्रिकेट खेळणे बंद करावे. तसेच स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मागे हटू नये, असा सल्ला रशिद लतिफसह पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी दिला आहे.

१९ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडला अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झालेली. त्यामध्ये पाकिस्तानने भारताला नमवून जेतेपद मिळवले. मात्र पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र शासनाने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाकरता दुबईचा पर्यायही सुचवला आहे. त्यासंबंधीचे पत्र बीसीसीआयने रविवारी आयसीसीला दिले होते. आयसीसीने यासंबंधी पीसीबीला कळवले आहे. मात्र पीसीबीने आयसीसीकडे भारताच्या नकारामागील स्पष्टीकरण मागितले आहे.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. त्यामुळेच मार्च २०२५मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाणार की नाही, याविषयीचा निर्णय केंद्र शासन घेईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेसुद्धा संमिश्र प्रारुपात (हायब्रीड मॉडेल) आयोजन करण्यात यावे, असे बीसीसीआयने सुचवले आहे. २०२३च्या आशिया चषकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. तर पाकिस्तानचा संघ काही लढती त्यांच्या देशात खेळला.

“माझ्या हाती अधिकार असते, तर मी पाकिस्तानला कोणत्याही स्पर्धेत भारताविरुद्ध खेळू दिले नसते. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान पाकिस्तानला पूर्वीच मिळालेला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मागे हटू नये. भारताला पाकिस्तानात येऊन क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्यांनी जगात अन्य कुठेही आमच्याविरुद्ध खेळू नये,” असे लतिफ म्हणाला.

“१२ वर्षे मायदेशात पाकिस्तानला एकही सामना खेळता आला नाही. तसेच भारताविरुद्ध सामने झाले नाही, तरी येथील क्रिकेटला कोणताही धोका उद्भवणार नाही. त्यामुळे भारतीय संघ नसेल येत, तर आयसीसीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,” असे मत माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने नोंदवले. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी कोणते वळण घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

... तर संपूर्ण स्पर्धा अन्य देशात खेळवण्याचा आयसीसीपुढे पर्याय

भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार खेळण्यासाठी पाकिस्तान मंडळाकडे विचारणा केली आहे. याबाबत पाकिस्तानकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यास ‘आयसीसी’ने संपूर्ण स्पर्धाच अन्य देशात स्थानांतरीत करण्याचा पर्याय समोर ठेवल्याची चर्चा आहे. पाकिस्तानात न खेळण्याची भूमिका स्पष्ट केल्यावर भारताने संमिश्र प्रारूप आराखड्यात सामने दुबईत खेळण्याची तयारी दर्शविली आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचल्यास अंतिम सामनाही दुबईतच होईल अशी अट टाकण्यात आली आहे. ‘आयसीसी’ने यासंदर्भात पाकिस्तान मंडळाकडे विचारणा केली आहे. स्पर्धा अशा स्वरूपात झाली, तरी ठरल्यानुसार आयोजन शुल्क पाकिस्तानला देण्यात येईल, असा विश्वास ‘आयसीसी’ने पाकिस्तानला दिला आहे.

भारताच्या अंध क्रिकेट संघाला मात्र मंजुरी

भारताच्या अंध क्रिकेट संघाला पाकिस्तानमध्ये होणऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाची अद्याप संघाला प्रतीक्षा आहे. भारताचे १७ खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत. २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये टी-२० विश्वचषक होणार असून २१ नोव्हेंबर रोजी वाघा बॉर्डरद्वारे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पोहोचेल, असे अपेक्षित आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगी नंतरच भारताचा स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश