क्रीडा

आशिया चषकातील थरारनाट्यात पाकिस्तान विजयी; भारत,अफगाणिस्तान परतणार माघारी

सुपर-फोरमधील सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एक गडी आणि चार चेंडू राखून मात केली

वृत्तसंस्था

यूएईतील शारजा स्टेडियमवर बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषकातील सामन्यादरम्यान मैदानावरील थरारनाट्यासह खेळाडूंमधील जुगलबंदी तसेच स्टेडियमध्ये चाहत्यांमधील हाणामारीही जगभरातील क्रीडारसिकांना अनुभवायला मिळाली. त्याचाच हा धावता आढावा.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सुपर-फोरमधील सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एक गडी आणि चार चेंडू राखून मात केली. अफगाणिस्तानने दिलेले १३० धावांचे लक्ष्य पाकिस्तानने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार लगावून गाठले. १०व्या क्रमांकाचा फलंदाज नसीम शाह पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानेच सलग दोन षटकार लगावून पाकिस्तानच्या अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानच्या विजयामुळे अफगाणिस्तानसह भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला २० षटकांत ६ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली. इब्राहिम झादरान (३५) आणि हजरतुल्ला झझई (२१) वगळता कोणीही त्यांच्याकडून कडवा प्रतिकार करू शकले नाही. पाकिस्तानसाठी हॅरिस रॉफने दोन, तर मोहम्मद हस्नैन, नसीम, शादाब खान आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचीही भंबेरी उडाली. फरीद अहमद आणि फझहल्लक फारुकी या दोन्ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी तीन बळी मिळवल्यामुळे पाकिस्तानची एकवेळ १८.५ षटकांत ९ बाद ११८ अशी अवस्था झाली. राशिद खाननेसुद्धा दोन बळी पटकावून पाकिस्तानला दडपणाखाली टाकले. शादाब खान (३६) आणि इफ्तिकार अहमद (३०) यांनी त्यांच्यासाठी सर्वोत्तम योगदान दिले.

परंतु सहा चेंडूंत ११ धावांची आवश्यकता असताना नसीमने फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार लगावले आणि सर्व पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. त्यानंतर खेळाडूंसह स्टेडियममधील चाहत्यांचा जल्लोष पाहण्याजोगा होता. आता रविवार, ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.

आसिफ-फरीदमध्ये खडाजंगी

आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मैदानातच खेळाडू भिडल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण मैदानातील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमके काय झाले?

आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर अडखळला होता. १९ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आसिफ बाद झाल्यानंतर फरीदने त्याच्यासमोर जाऊन आक्रमकपणे आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या आसिफने त्याला मागे ढकललं. यानंतर फरीद पुन्हा पुढे आल्यानंतर आसिफने त्याच्यावर बॅट उगारत संताप व्यक्त केला. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी फरीदला बाजूला नेत वाद मिटवला.

चाहत्यांचा रोष अनावर

मैदानामध्ये सुरू झालेली ही लढत स्टेडियमच्या बाहेरपर्यंत पोहोचली. अफगाणिस्तानने सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले आणि त्यांना बेदम मारहाण केली. अफगाण चाहत्यांनी स्टेडियमचेही नुकसान केले. या सगळ्याचे कारण होते ते म्हणजे पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीचे लज्जास्पद कृत्य.

हंटर कमिशनने मांडलेले वास्तव व भूमिका

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड