नवी दिल्ली : एकीकडे क्रिकेटमध्ये पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान लढतीला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र त्याचवेळी भारतात होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतून पाकिस्तानच्या संघाने माघार घेतली आहे. पाकिस्तानसह ओमाननेही स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले असून त्यांच्या जागी बांगलादेश व कझाकस्तान यांना स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतीय हॉकी महासंघातर्फे बिहार येथील राजगिर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ८ संघांचा समावेश असून भारत, चीन, जपान व कझाकस्तान अ-गटात, तर बांगलादेश, चायनीज तैपई, मलेशिया व दक्षिण कोरिया ब-गटात आहेत. हॉकीच्या आशिया चषकाचे हे १२वे पर्व असून भारत २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असून दक्षिण कोरियाने सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवले आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध व खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तवच पाकिस्तानने या स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. भारतीय शासनाने पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसासह सर्व सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाकिस्तान हॉकी महासंघाने स्वत:हूनच भारतात येण्यास नकार दर्शवला आहे. ओमानच्या माघारीमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. आर्थिक अडचण असल्याने ओमान या स्पर्धेत सहभागी झाला नसावा, असे समजते.
पाकिस्तानच्या माघारीची आधीच कल्पना असल्याने भारताने बांगलादेश संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती. बांगलादेशने ती मान्य केली आहे. तर कझाकस्तान त्यांच्या क्रमवारीनुसार आशिया चषकासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे हॉकीप्रेमींचे लक्ष लागून आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर
आशिया चषकासाठी भारताचा पुरुष संघ जाहीर करण्यात आला असून नेहमीप्रमाणे हरमनप्रीत सिंग या संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेचा विजेता थेट पुढील वर्षी रंगणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल. क्रेग फुल्टन हे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत.
भारताचा संघ : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), कृष्णन पाठक, सुरज करकेरा, सुमीत, जर्मनप्रीत सिंग, संजय, अमित रोहिदास, जुगराज सिंग, राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक प्रसाद, मंदीप सिंग, शिलानंद लाकरा, अभिषेक सिंग, दिलप्रीत सिंग.