Twitter
क्रीडा

Paris 2024 Olympics: लक्ष्य सेनचे प्रयत्न अपुरे! आज कांस्यपदकासाठी भिडणार; उपांत्य फेरीत ॲॅक्सेलसेनकडून पराभूत

Swapnil S

पॅरिस : पुरुषांच्या एकेरीत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे भारताचे बॅडमिंटनमध्ये पहिलेवहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावण्याचे भारताचे स्वप्न अखेर अधुरे राहिले. लक्ष्य सेनने विद्यमान चॅम्पियन विक्टर ॲॅक्सेलसेनला कडवी लढत दिली, अखेर त्याचे प्रयत्न अपुरेच ठरले.

अल्मोराचा २२ वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य याने पहिल्या गेममध्ये तीन गुणांची आघाडी असतानाही तसेच दुसऱ्या गेममध्ये ७-० असे आघाडीवर असतानाही ५४ मिनिटे रंगलेल्या या लढतीत पराभव पत्करला. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ॲॅक्सेलसेनने लक्ष्यचा प्रतिकार २२-२०, २१-१४ असा मोडून काढला. आता लक्ष्य सेनला ऑलिम्पिक पदक जिंकण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. कांस्यपदकासाठी त्याची लढत आता मलेशियाच्या ली झी जिया याच्याशी होणार आहे.

पी. व्ही. सिंधूने भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून दिले आहे. तसेच सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. भारताला बॅडमिंटनमध्ये एकही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. लक्ष्यच्या रूपाने भारत सुवर्णपदकाला गवसणी घालेल, असे वाटले होते. मात्र त्याचे प्रयत्न अखेर तोकडे पडले. लक्ष्यचा हा डेन्मार्कच्या ॲॅक्सेलसेनविरुद्धचा आठवा पराभव ठरला. २०२२च्या जर्मन ओपनच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनने ॲॅक्सेलसेनला एकदाच हरवले आहे. “पहिला गेम मी जिंकला असता तर मला हा सामना संपवण्याची संधी मिळाली असती. दुसऱ्या गेममध्येही मी चांगली सुरुवात केली होती, मात्र मला आघाडी कायम टिकवता आली नाही. सामना जसजसा रंगत गेला, तसतसा ॲॅक्सेलसेन अधिक आक्रमक होत गेला, त्यामुळे मला बचावावर जास्त भर द्यावा लागला,” असे लक्ष्यने पराभवानंतर सांगितले. ॲॅक्सेलसेनने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या गेममध्ये २-५ असा पिछाडीवर पडल्यानंतर लक्ष्यने क्रॉसकोर्ट आणि स्मॅशेस लगावत ८-७ अशी आघाडी घेत ॲॅक्सेलसेनवर दडपण आणले. प्रतिस्पर्ध्याकडून चूका होऊ लागल्यामुळे लक्ष्य १५-९ असा आघाडीवर होता. त्याने ही आघाडी १७-११ अशी वाढवली. मात्र त्यानंतर ॲॅक्सेलसेनने सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. ॲॅक्सेलसेनने पहिला गेम २२-२० असा जिकला.

पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दमदार खेळ करत दुसऱ्या गेममध्ये ७-० अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ॲॅक्सेलसेनने जोमाने पुनरागमन केले. लक्ष्यच्या चुकांचा फायदा उठवत डेन्मार्कच्या खेळाडूला ७-८ असे कमबॅक करता आले. ॲॅक्सेलसेन आघाडीवर गेल्यानंतर त्याला गाठताना लक्ष्यच्या नाकी नऊ आले. त्यामुळेच १९-१४ अशा स्थितीतून ॲॅक्सेलसेनने दोन गुण मिळवत दुसऱ्या गेमसह अंतिम फेरीत धडक मारली.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत