यॉर्कर
- ऋषिकेश बामणे
२०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरला तिन्ही प्रकारांत खेळण्याची संधी मिळाली. पण तिच्या खेळात गुणकौशल्ये दिसलीच नाहीत. १० मीटर एअर पिस्तूल आणि २५ मीटर एअर पिस्तूल या दोन्ही प्रकारांत तिला अंतिम फेरी गाठता आली नाही. मिश्र प्रकारात सौरभ चौधरीबरोबरीने खेळतानाही तिला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. असे म्हणतात की जेव्हा तुमचा वाईट काळ असतो, तेव्हा त्यात भर पडत जाते. १० मीटर प्रकारात खेळत असताना तिच्या पिस्तूलात बिघाड झाला. तो बिघाड दुरुस्त झाला नाही आणि तिला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. पिस्तूल प्रशिक्षक रौनक पंडित तिचे सांत्वन करत असल्याचा फोटो दुसऱ्या दिवशी सगळीकडे आला होता.
हीच किशोरवयीन मनू आता मात्र प्रगल्भ झाली आहे. ३० जुलै, २०२४ या दिवसाने त्यावर शिक्कामोर्तब केले. किंबहुना आता संपूर्ण भारतावर मनूमोहिनी पाहायला मिळत आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अवघ्या २२व्या वर्षीच मनूने दोन ऐतिहासिक कांस्यपदके जिंकण्याची करामत केली आहे. मुख्य म्हणजे गेल्या १२ वर्षांत भारतीय नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आले नव्हते. त्यातही महिला नेमबाजाने भारतासाठी कधीही पदक पटाकावले नव्हते. मात्र मनूने या सर्व नकारात्मक बाबींवर मात करतानाच चौकटीपलीकडला वेध साधला. मनूच्या यशाचे गोडवे गाण्यापूर्वी भूतकाळात काय झाले होते, याचा आढावा घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मनूच्या आईने चार वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक जसपाल राणा यांना केलेला मेसेज फारच चर्चेचा मुद्दा ठरला होता. “शांती मिल गयी. तुमचं अभिनंदन. आप को और अभिषेकको अपना इगो मुबारक” असा मेसेज मनूची आई सुमेधा यांनी केला होता. नियतीचा खेळ पाहा, यंदा दुसरे पदक जिंकल्यानंतर मनूच्या वडिलांनी याचे श्रेय प्रशिक्षक जसपाल राणा यांनाच दिले. असो. मात्र ४ वर्षांपूर्वी मनूच्या आईने केलेल्या या मेसेजने संतापलेल्या जसपाल यांनी हे शब्द टी-शर्टवर प्रिंट करून घेतले. हा टीशर्ट परिधान करून ते फरिदाबाद इथल्या करणी सिंग रेंजवर आले. त्यांचा टी-शर्ट चर्चेचा विषय झाला. मनू आणि जसपाल यांच्यात विस्तव जात नसल्याचे स्पष्ट झाले.
नेमबाज म्हणून दमदार कारकीर्दीनंतर जसपाल यांनी युवा भारतीय नेमबाजांना मार्गदर्शनाचं काम हाती घेतलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केल्यापासून मनू त्यांच्याच मार्गदर्शनात खेळते आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी मनू १० मीटर पिस्तूल आणि २५ मी पिस्तूल अशा दोन्ही प्रकारांत पात्र ठरली. नेमबाजी संघटनेला दोन्ही प्रकारांत तिला पाठवायचे होते. जसपाल यांनी वेगळा विचार मांडला. २५ मीटर पिस्तूल प्रकारात चिंकी यादवला पाठवावे असं त्यांचे मत होतं. जेणेकरून मनूला १० मीटर पिस्तूल प्रकारावर लक्ष केंद्रित करता येईल. १० मी पिस्तूल मिश्र प्रकारात ती सौरभ चौधरीच्या बरोबरीने खेळू शकेल.
जसपाल यांनी कारणमीमांसाही केली. १८व्या वर्षी ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत तीन विभिन्न प्रकारात खेळण्यासाठी मनू तयार नव्हती. तिच्यासाठी हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूपच कठीण झालं असतं. तिन्ही प्रकारात तुम्ही सहभागी होऊ शकता पण मग कुठल्यातरी एका प्रकारावर अन्याय होतो. त्यामुळे आपणच साकल्याने विचार करून कुठल्या प्रकारात खेळायचं ते ठरवायला हवे. १० मीटर पिस्तूल मिश्र प्रकारात सौरभ-मनूला सुवर्णपदकाची संधी होती. मनूऐवजी चिंकी संघात असावी असं तिला सांगण्यात आलं पण त्यामागे माझं काय म्हणणं होतं हे तिला कुणीही सांगितलं नाही. यामुळे ती नाराज होणे, रागावणं साहजिक होते, असे जसपाल म्हणाले होते.
गुरू-शिष्यांमधला हा वाद राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषकात बाहेर पडला. चिंकीने २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनूला हरवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. चिंकी जिंकताच मनूच्या आईने जसपाल यांना तो मेसेज केला. मात्र आज हेच जसपाल मनूच्या कारकीर्दीतील द्रोणाचार्य ठरले. मनूने पुन्हा त्यांची मदत घेणे भारतासाठीही लाभदायी ठरले. मनू दरम्यानच्या काळात अन्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळली. मात्र जसपाल यांनी तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरी घडवून घेतली. “त्यांना पाहिलं की बळ मिळतं. जसपाल सर यांच्या मार्गदर्शनात माझा खेळ सर्वोत्तम होतो. माझ्या पदकात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,” असे मनूही स्वत: म्हणाली.
मनूचा विजय हा नव्या पिढीचा आहे. समाज माध्यमांवर ॲक्टीव्ह असली तर त्यामध्ये पूर्णपणे रमून न जाणारी मनू भगवत गीता सातत्याने वाचते. त्याचाच परिणाम तिच्या कामगिरीतही दिसून आला. मनूसाठी केंद्र शाससाने २ कोटींची निधीही दिला होता. तिने या दोन पदकांद्वारे जणू त्याची परतफेड केली आहे. मनूच्या वयात पदवीचे शिक्षण संपवून असंख्य युवा नोकरीच्या प्रतीक्षेत असतात. या वयात मनू मात्र भारताच्या सक्षम महिलेचे प्रतिनिधित्व करत आहे. अपयशातून सावरत कशाप्रकारे झोकात पुनरागमन करावे, याचा धडा मनूने आपल्यासमोर सादर केला असून यापुढेही ती अशीच उंच भरारी घेत राहो, हीच इच्छा.
bamnersurya17@gmail.com