हैदराबाद : आयपीएलच्या पटलावर सोमवारी रात्री आणखी एका ताऱ्याचा उदय झाला. विदर्भाचा २४ वर्षीय मराठमोळा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने पदार्पणातच दंगा केला. त्याने ३४ धावांत मिळवलेल्या चार बळींच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने अग्रस्थानावरील राजस्थान रॉयल्सला ५७ धावांनी धूळ चारली.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत हैदराबादने २० षटकांत ६ बाद २१६ धावांचा डोंगर उभारला. मात्र राजस्थानकडे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज असल्याने तसेच हैदराबादची गोलंदाजी काहीशी कमकुवत असल्याने राजस्थानचा संघ हे लक्ष्य सहज गाठेल, असे वाटले. मात्र प्रत्यक्षात झाले ते वेगळेच. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रफुल्लने पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा अडसर दूर केला. प्रफुल्लने बाऊन्सरवर त्याला चकवले. याच षटकात मग अनुक्रमे चौथ्या व सहाव्या चेंडूवर प्रफुल्लने ध्रुव जुरेल व प्रिटोरियस यांनाही बाद करून राजस्थानची १ बाद ३ अशी अवस्था केली. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या गोलंदाजाने पहिल्या षटकात ३ बळी मिळवले.
हे कमी म्हणून की काय, पुढच्या षटकात अन्य पदार्पणवीर व बिहारचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज साकिब हुसैनने यशस्वी जैस्वालचा बळी मिळवला. तिसऱ्या षटकात मग प्रफुल्लने कर्णधार रियान परागलाही माघारी पाठवून हैदराबादचा विजय पक्का केला. अखेरीस राजस्थानचा संघ १९ षटकांत १५९ धावांत गारद झाला. प्रफुल्ल व साकिब दोघांनीही ४ बळी मिळवले. मात्र प्रफुल्लने पहिल्याच षटकात टाकलेल्या प्रभावामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
देशांतर्गत स्पर्धेत विदर्भाकडून खेळणारा प्रफुल्ल हा ताशी १३५ ते १४० किमी वेगाने गोलंदाजी करतो. वायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रफुल्लने पहिल्याच सामन्यात आपण ३-४ बळी मिळवू, असे म्हटल्याचे दिसून येते. मैदानातही त्याने ते करून दाखवले. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर प्रफुल्लचे सामन्यापूर्वी फक्त ६ हजारांच्या आसपास फॉलोअर्स होते. मात्र आता हीच संख्या दिवसभरात थेट १ लाखांच्या घरात पोहोचली आहे. प्रफुल्लने १० रणजी सामन्यांत २७ बळी मिळवले आहेत. हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक वरुण आरोनने प्रफुल्लवर लिलावात ३० लाखांची बोली लावून संघात घेतले होते. अखेर प्रफुल्लने पदार्पणातच त्याचा विश्वास सार्थ ठरवला.
कार्सच्या जागी मदुशंका हैदराबादकडे
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रेडन कार्स दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची सनरायजर्स हैदराबाद संघाने निवड केली आहे. कार्सला पहिल्या लढतीपूर्वी सरावात दुखापत झाली. मदुशंका हा २०२४च्या हंगामात मुंबईकडे होता. मात्र दुखापतीमुळे तो एकही लढत न खेळता स्पर्धेबाहेर गेला होता. आता हैदराबादकडून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
आयपीएल गुणतालिका
(राजस्थान वि. हैदराबाद सामन्यापर्यंत)