मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या पर्वात पुन्हा एकदा नागपूर निंजास म्हणजेच आर्यन्स गोविंदा पथकाने बाजी मारताना सलग दुसऱ्या जेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अवघ्या २१ सेकंदांत ८ थर रचले. नाशिक रेंजर्स म्हणजेच जय जवान गोविंदा पथकाने उपविजेतेपद मिळवले.
वरळी डोम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला ७५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, चौथ्या पर्वाचा ब्रँड ॲम्बेसेडर क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रो गोविंदा लीगच्या संचालिका कश्मिरा सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
द्वितीय पारितोषिक विजेत्या नाशिक रेंजर्सला (जय जवान गोविंदा पथक) ५० लाख, तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या अलिबाग नाइट्सला (बाल उत्साही गोविंदा पथक) २५ लाख रुपये देण्यात आले. तसेच स्पर्धेतील उर्वरित सर्व सहभागी संघांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
अंतिम फेरीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला. यावेळी ते म्हणाले, “दहीहंडी खेळ हा मातीपासून ते मॅटपर्यंत गेला आणि तो पुढे स्पेनपर्यंतही गेला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा खेळ पुढे कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकमध्ये घेऊन जाऊ. त्यासाठी राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे.”
“मातीपासून ते मॅटपर्यंतचा गोविंदांचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. गोविंदाचे संघ कौशल्य, जिद्द, मेहनत आणि अचूक टायमिंग पाहून खूप थक्क झालो. थरावर थर लावणे हे सोपे नाही. सर्व गोविंदांच्या जिद्द आणि समर्पणाला सलाम,” असे भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार म्हणाला.
यंदा अंतिम फेरीत १६ संघ सहभागी झाले होते. यंदाचा सामना अधिकच रोमहर्षक झाला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. मात्र आर्यन्सने यामध्ये अखेरीस बाजी मारली.