नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी संमिश्र यशाचा ठरला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठून तिसऱ्या पदकाच्या दिशेने पाऊल टाकले. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवले. मात्र, दोन वेळेची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि युवा खेळाडू आयुष शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला मोठा धक्का बसला.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सोमवारपासून जागतिक स्पर्धेच्या ३०व्या पर्वाला प्रारंभ झाला. भारताला २००९ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तसेच जानेवारी महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटना (बीएआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी स्टेडियमच्या रचनेत व सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे एकूणच या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंची तसेच आयोजकांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग यांच्या नवव्या मानांकित जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि याप रॉय किंग या जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असलेल्या जोडीचा २१-२३, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पहिल्या फेरीत बाय आणि दुसऱ्या फेरीत वॉकओव्हर मिळाल्यानंतर या स्पर्धेतील त्यांचा हा पहिलाच सामना होता. २०२२ आणि २०२५ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या या जोडीने १ तास चाललेल्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला.
दुसरीकडे, पी. व्ही. सिंधूचे विक्रमी सहावे पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. चीनच्या तिसऱ्या मानांकित वांग झी ई हिने सिंधूचा ११-२१, २१-१५, १७-२१ असा पराभव केला. सामन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पायांत तीव्र गोळे (क्रॅम्प्स) येत असतानाही चीनच्या खेळाडूने कडवी झुंज देत विजय मिळवला. “तिला दुखापत झाली होती की ती तिची रणनीती होती हे मला माहित नाही, परंतु अशा पराभवामुळे खूप त्रास होतो,” अशी प्रतिक्रिया सिंधूने सामन्यानंतर दिली.
पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत २१ वर्षीय आयुष शेट्टीला इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असलेल्या अलवी फरहानकडून १९-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या फेरीत जगज्जेत्या शी यू कीचा पराभव करणाऱ्या आयुषच्या पराभवामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. बुधवारी लक्ष्य सेनही स्पर्धेतून बाहेर पडला होता.
महिला दुहेरीत बिगरमानांकित ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी जपानच्या सातव्या मानांकित रिन इवानागा आणि की नाकानीशी या जोडीचा २१-१६, २१-१२ असा धुव्वा उडवला. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या त्रिसाने गायत्रीच्या साथीने प्रभावी खेळ करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१५ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्यानंतर जागतिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ही पहिलीच भारतीय महिला दुहेरी जोडी ठरली आहे.
त्यापूर्वी, बुधवारी पुरुष एकेरीत भारताचा २०२१मधील कांस्यपदक विजेता खेळाडू लक्ष्य सेनला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून १९-२१, २१-१९, १७-२१ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर निराश झालेल्या लक्ष्यने सांगितले की, सामना अत्यंत कठीण होता आणि तिसऱ्या गेममध्ये तो शारीरिकदृष्ट्या थकला होता, तर टॅनने उत्कृष्ट खेळ दाखवला. पहिल्या फेरीच्या लढतीत लक्ष्यने बल्गेरियाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलीमन याचा ४५ मिनिटे चाललेल्या सामन्यात १६-२१, २१-८, २१-४ असा पराभव केला होता. त्याच्याकडून यंदा अपेक्षा होत्या. दुसरीकडे आयुष शेट्टीने श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रमाचा २१-८, २१-१० असा सहज पराभव करत इंडोनेशियाच्या फरहानविरुद्धची लढत निश्चित केली होती. मात्र आता तोदेखील गारद झाला आहे.
महिलांमध्ये सहावे जागतिक पदक जिंकण्याच्या शर्यतीत असलेल्या नवव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या वेन यू झँगचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला होता. मात्र आता सिंधूच्या पराभवामुळे भारताचे महिला एकेरीतील आव्हानही समाप्त झाले. दुसरीकडे पदार्पण करणाऱ्या उन्नती हूडाला कॅनडाच्या १२व्या मानांकित मिशेल लीकडून २१-११, ९-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला. उन्नती हिने म्यानमारच्या थेट हतार थुझारला पहिल्या फेरीत २२-२०, २१-१६ असे हरवले होते.
त्यामुळे आता पुरुष व महिला दुहेरीत सात्विक-चिराग, ट्रीसा-गायत्री यांच्यावरच भारताच्या आशा टिकून आहेत. २०२५मध्ये भारताला एकही जागतिक पदक जिंकता आले नव्हते.